उत्तरप्रदेशातील आमरोही येथील निर्घृण हत्याकांडासाठी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला सलीम याच्या बेदरकारपणामुळे फाशीच्या शिक्षेचे गांभीर्य आपणच किती अल्प केले आहे, हे दिसून येते. वर्ष २००८ मध्ये आमरोही, बावनखेडी येथील उच्चशिक्षित कुटुंबातील शबनम हिने संपत्तीसाठी तिचा प्रियकर सलीम याच्या साहाय्याने घरातील ७ सदस्यांची हत्या केली. वर्ष २००८ मध्ये शबनम आणि सलीम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. सलीम याची दया याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे. आता त्याने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. एका पोलीस अधिकार्याने सलीमला ‘आता तुझी फाशी टळणार नाही’, असे म्हटल्यानंतर सलीमने दिलेले उत्तर आपल्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करते. सलीम म्हणाला, ‘‘साहेब, कशाला काळजी करता ? इतक्या लवकर मला फाशी देणार नाही !’’
एकाच कुटुंबातील ७ जणांचा थंड डोक्याने हत्या केल्याची घटना घडल्याला आता १२ वर्षे झाली. अजूनही चर्चा आणि न्यायालयीन प्रक्रियाच चालू असतील, तर त्याचे गांभीर्य काय रहाणार ? फाशीची शिक्षा सहजासहजी कोणत्याही गुन्ह्यात दिली जात नाही. ७ जणांचा जगण्याचा अधिकार ज्यांनी हिरावला, त्यांना गेली १२ वर्षे सरकारी यंत्रणा का पोसत आहे ? फाशीच्या प्रत्येक प्रकरणात गुन्हे धडधडीत सिद्ध होऊनही दया याचिका, पुनर्विचार याचिका अशी कारणे काढली जातात. हे सगळे झाल्यावर पुन्हा मानवाधिकारवाले इत्यादींचे चोचले पुरवावे लागतात. तोपर्यंत ज्या गुन्ह्यासाठी हे सर्व होत आहे, त्याविषयीच्या भावना बोथट होतात आणि ती शिक्षा ही केवळ एक औपचारिकता उरते. गुन्हा घडल्यानंतर आरोप सिद्ध करणे, त्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आणि आरोपीला योग्य ती शिक्षा करणे, हे जितक्या गतीने होते, तितके समाजात चांगला संदेश जातो की, ‘असे गुन्हे करायचे नसतात. त्याची फळे आपल्याला भोगावी लागतात.’ असे न करता गुन्हेगारांविषयी सहानुभूती निर्माण होईल, एवढी वर्षे या प्रक्रिया लांबवल्याने अशा प्रकारे गुन्हेगारही गेंड्याच्या कातडीचे होतात. सध्या आपली व्यवस्था अशी झाली आहे की, पाकीटमारांना ठाऊक असते की, ‘चुकून पकडलो गेलोच, तरी हवालदाराला त्याचा वाटा दिला की, तो आपल्याला सोडणार आहे.’ चोर-दरोडेखोरांना ठाऊक असते की, ‘फार काय करतील, २-४ वर्षे आत रहावे लागेल इतकेच !’ आणि आता तर बलात्कारी अन् खुनी यांनाही कळून चुकले आहे की, ‘फाशी वगैरे काही लगेच होत नसते !’ ज्याचा धाक असायला हवा, त्यातीलच हवा निघून गेली आहे ! सगळ्यांना मोकळे रान मिळाले आहे, असेच तर यातून दिसून येत नाही ना ?