‘३.९.२०२० या दिवशी झालेल्या भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापन होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसा देव आपल्यावर भरभरून कृपेचा वर्षाव करत आहे.’’ त्याची प्रचीती देवद आश्रमात १३.९.२०२० या दिवसापासून निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत साधकांना घेता आली.
१. रुग्णाईत नसलेले १५ ते २० साधक अन्य रुग्णाईत साधकांना प्रसाद आणि महाप्रसाद नेऊन देत असणे अन् तेच साधक आश्रमसेवा करत असणे
१३.९.२०२० या दिवसापासून आश्रमातील बरेच तरुण आणि मध्यमवयीन साधक रुग्णाईत होते. एरव्ही प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करण्याच्या वेळी १०० साधक असणार्या भोजनगृहात त्या कालावधीत केवळ १५ ते २० साधक उपस्थित असायचे. तेव्हा याचा ‘आश्रमसेवांवर परिणाम होईल’, असे आम्हाला वाटले होते; परंतु गुरुमाऊलींची कृपा अगाध आहे. रुग्णाईत नसलेले १५ ते २० साधकच अन्य रुग्णाईत साधकांना प्रसाद आणि महाप्रसाद नेऊन देणे अन् अन्य आश्रमसेवा करणे इत्यादी करत होते.
२. ‘सर्व सेवा आपल्याच आहेत’, या भावाने साधकांनी सेवा केल्याने खर्या अर्थाने आश्रम एक मोठे कुटुंब असल्याचे जाणवणे
एरव्ही नियमितपणे एक-दोनच आश्रमसेवा आणि नियमित सेवा करणारे साधक या कालावधीत एकाच वेळी ४ – ५ आश्रमसेवा अथवा वेळप्रसंगी त्याहीपेक्षा अधिक सेवा कोणतीही तक्रार न करता आनंदाने, उत्साहाने आणि शांतपणे करत होते. आश्रमातील साधक ‘सर्व सेवा आपल्याच आहेत’, या भावाने करत होते. तेव्हा ‘खर्या अर्थाने आश्रम एक मोठे कुटुंब आहे’, हे अनुभवायला मिळाले. अनुमाने ३ आठवडे अशी स्थिती होती.
३. अनुभूती
३ अ. प्रतिकूल परिस्थितीतही गुरुकृपेने आश्रमातील चैतन्यात वाढ झाल्याचे जाणवणे : ‘केवळ गुरुमाऊलींच्या कृपेनेच सातत्याने इतक्या सेवा करणे साधकांना शक्य झाले’, असे विचारांती लक्षात आले. त्या वेळी ‘आपण काहीच करू शकत नाही’, हे प्रकर्षाने जाणवले. गुरुमाऊलीच साधकांना सर्व सेवा करण्यासाठी चैतन्य आणि शक्ती पुरवत होती. या कालावधीत ‘आश्रमातील चैतन्यातही वाढ झाली आहे’, असे मला जाणवत होते.
३ आ. आश्रम परिसरातील फुलझाडांवरही आश्रमातील चैतन्याचा प्रभाव होणे : आश्रमातील चैतन्याचा प्रभाव आश्रम परिसरातील फुलझाडांवरही झाल्याचे दिसत होते. पूजेसाठी सकाळी ६.३० वाजता काढलेली आश्रम परिसरातील जास्वंदीची फुले संध्याकाळी ७ वाजल्यानंतरही आताच काढून वाहिल्याप्रमाणे ताजी रहात होती. त्यांचा आकारही पूर्वीच्या तुलनेत मोठा होता आणि झाडांना फुलेही भरपूर येत होती (तत्पूर्वी आश्रम परिसरातील ५ – ६ झाडांना मिळून जेमतेम ५ – ६ फुलेच येत होती. तेच आता एका झाडाला १८ ते २० फुले येतात.), तसेच दुसर्या दिवशी सकाळी ‘निर्माल्यातील फुले कोमेजली, करपलेली (वाळली) आहेत’, असे नसायचे.
‘प्रतिकूल परिस्थितीत देव कसे सांभाळतो’, याची अनुभूती दिल्याविषयी त्याच्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता !’
– कु. नलिनी राऊत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |