कर्नाटकच्या भाजप सरकारच्या कृषीमंत्र्यांनी घरातच सपत्नीक घेतली कोरोनाची लस !

  • टीका झाल्यानंतरही केले चुकीचे समर्थन !
  • सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा मंत्र्यांवर भाजपने कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !  
भाजपचे कृषीमंत्री बी.सी. पाटील यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना बंगल्यावर बोलावून सपत्नीक लस टोचून घेतली.

बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री  रुग्णालयात जाऊन, तर जनता रुग्णालयांबाहेर रांग लावून कोरोनावरील लस घेत आहेत. असे असतांना कर्नाटकमधील भाजप सरकारचे कृषीमंत्री बी.सी. पाटील यांनी मात्र आरोग्य कर्मचार्‍यांना बंगल्यावर बोलावून सपत्नीक लस टोचून घेतली. तसेच यावरून त्यांच्यावर टीका झाल्यानंतरही त्यांनी या घटनेचे समर्थन करत ‘यात चूक काय आहे ?’ असा उलट प्रश्‍न केला आहे. या घटनेची केंद्रीय आरोग्य विभागाने नोंद घेतली असून त्याने कर्नाटक सरकारकडून यासंदर्भातला अहवाल मागवला आहे.

बी.सी. पाटील म्हणाले, ‘‘मी चोरी केली आहे का ? मी घरी लस टोचून घेतली. असे करणे काही गुन्हा नाही. जर मी लसीकरणासाठी रुग्णालयात गेलो असतो, तर तेथील रांगेत उभे असलेल्या लोकांना अडचण आली असती.’’ (पाटील यांना जे वाटते, ते केंद्रीय मंत्र्यांना वाटले नाही. म्हणजे पाटील यांना त्यांच्यापेक्षा अधिक कळते, असे समजायचे का ? – संपादक)