प्रेमाच्या खोट्या जाळ्यात (हनीट्रॅपद्वारे) अडकवून फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या कह्यात

नागरिकांनी वेळीच सतर्क राहून फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात आवाज उठवायला हवा !

सातारा, २ मार्च (वार्ता.) – व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आदी सामाजिक संकेतस्थळांद्वारे ओळख निर्माण करत प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून नागरिकांना लुटणार्‍या तिघांना सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कह्यात घेतले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. काजल प्रदीम मुळेकर, अजिंक्य रावसाहेब नाळे आणि वैभव प्रकाश नाळे अशी संशयितांची नावे आहेत.

१. ६ डिसेंबर २०१९ या दिवशी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आदी सामाजिक संकेतस्थळांद्वारे ओळख निर्माण करत प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून महिलेने एकाला ठोसेघर येथे भेटण्यासाठी बोलवले. तो आल्यानंतर त्याच्याकडून सोने, रोख रक्कम आणि चारचाकी काढून घेऊन त्याला मारहाण केली. तसेच त्याची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रीकरण करून सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

२. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली होती. त्यानुसार पोलीस तपास करत असतांना अनेक घटना घडल्या; मात्र समाजात मानहानी होईल, या भीतीने कुणीही पोलिसात तक्रार दिली नाही. सातारा तालुका पोलिसांनी बातमीदारांकडून माहिती घेऊन एकाला कह्यात घेतले.

३. त्याने संबंधितांची नावे सांगितली आणि प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून फसवणूक करणारी संपूर्ण टोळी पोलिसांच्या हाती लागली. अशी घटना आणखी कुणासमवेत घडली असल्यास त्यांनी सातारा तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.