(म्हणे) ‘पुराव्याविना करण्यात येणार्‍या आरोपांना कोणताच अर्थ नाही !’

सायबर आक्रमणाद्वारे मुंबईचा वीजपुरवठा बंद पाडल्याच्या दाव्यावर चीनचे स्पष्टीकरण

चीन ‘त्याने आक्रमण केले’ असे कधीही मान्य करणार नसल्याने अशा स्पष्टीकरणाला काहीच अर्थ नाही ! भारतानेही चीनला प्रत्युत्तर देतांना पुरावा मागत न बसता जशास तसे आक्रमण करण्याची आवश्यकता आहे !

नवी देहली – चीन सायबर सुरक्षेच्या बाजूने नेहमीच उभा राहिला आहे. कोणत्याही सायबर आक्रमणाचा चीनने नेहमीच विरोध केला आहे. कोणत्याही पुराव्याविना आक्रमणाच्या शक्यता वर्तवण्याच्या आरोपांना काहीही महत्त्व रहात नाही. विनापुरावा आरोप करणे हे दायित्वशून्यतेचे लक्षण आहे, असे वक्तव्य चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केले आहे.

१२ मार्च २०२० या दिवशी मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला होता. चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे असे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. महाराष्ट्राच्या उर्जामंत्र्यानेही याला दुजोरा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.

अमेरिकेला भारतासमवेत उभे रहायला हवे ! – अमेरिकेचे खासदार फ्रँक पॅलोन

अमेरिकेचे खासदार फ्रँक पॅलोन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेला आपल्या मित्रासमवेत (भारतासमवेत) उभे रहायला हवे आणि भारतातील पॉवर ग्रीडवर चीनच्या धोकादायक सायबर आक्रमणाचा निषेध केला पाहिजे, असे अमेरिकेतील खासदार फ्रँक पॅलोन यांनी अमेरिकेच्या सरकारला उद्देशून म्हटले आहे.

चीनने सायबर आक्रमण करून मुंबईचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या प्रकरणी ते बोलत होते. पॅलोन पुढे म्हणाले की, बळाचा वापर करून किंवा धमक्या देऊन चीनला वरचढ होण्याची सूट देता येणार नाही.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, चीनने भारताच्या विरोधात रचलेल्या षड्यंत्राच्या संदर्भातील अहवालाविषयी आम्हाला सर्व ठाऊक आहे. अमेरिका सायबरमधील संकटांना उत्तर देण्यासाठी जगातील सर्व देशांना संघटित करून काम करण्यासाठी कटीबद्ध आहे.