सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावरील आनेवाडी (सातारा) आणि खेड-शिवापूर (पुणे) येथील पथकर नाक्यावर बनावट देयके देऊन वाहनचालकांची फसवणूक चालू होती. यामुळे शासनाचा आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या चोरीमध्ये ६ कर्मचारी सहभागी होते. (कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ? – संपादक) पुणे येथील राजगड पोलिसांनी २४ फेब्रुवारीच्या रात्री ही चोरी उघडकीस आणली. या प्रकरणी पोलिसांनी आनेवाडी पथकर नाक्यावरून २ जणांना, तर खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यावरून ४ जणांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास चालू केला असून बनावट देयकांची यंत्रणा मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.