चिनी आस्थापनांना गुंतवणूक करण्याची अनुमती देण्याचा कोणताही विचार नाही ! – केंद्र सरकार

राष्ट्रहितासाठी चिनी आस्थापनांना आता आणि पुढेही भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती देऊ नये !

नवी देहली – चीनच्या ४५ आस्थपनांना भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती मिळण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले होते. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देतांना ‘चीनच्या आस्थापनांना भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती देण्याचा कोणताही विचार नाही’, असे स्पष्ट केले आहे. ‘सरकारने ३ विदेशी गुंतवणुकींना मान्यता दिली आहे. यांतील २ जपानी आस्थापने, तर एक अनिवासी भारतियांचा गट आहे’, असे एका सरकारी अधिकार्‍याने सांगितले.

या अधिकार्‍याने हेही स्पष्ट केले की, चीनसमवेत कोणत्याही प्रकारचे करार करतांना सरकार घाईगडबड करणार नाही. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनचे पुढील पाऊल काय असणार, याकडे भारताचे लक्ष आहे. त्यामुळे चीनवर जे काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत, ते हटवण्याची घाई करण्यात येणार नाही.