पिंपरी – महापालिकेचा २०२१ – २२ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ सहस्र ५८८ कोटी ७८ लाख, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ सहस्र ११२ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये सादर करण्यात आला. महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी जितेंद्र कांबळे, आयुक्त राजेश पाटील, सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि विकास ढाकणे या वेळी उपस्थित होते. अर्थसंकल्पाच्या अभ्यासासाठी ही विशेष सभा २४ फेब्रुवारीला दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महापालिकेच्या विकासकामांसाठी १ सहस्र ६३० कोटी ७४ लाख रुपयांची तरतूद असून मागासवर्गीय कल्याणकारी योजना, क्रीडा, दिव्यांग, भूसंपादन यांसह शहर रचना आणि नियोजन, सार्वजनिक सुरक्षितता आणि स्थापत्य, आरोग्य, शिक्षण, वैद्यक विभाग, उद्यान आणि पर्यावरण यांसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.