सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – कास पठाराच्या कुशीत घनदाट वनराईत आदीमाया आदीशक्ती श्री घाटाई देवीचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात आता मद्य आणि मांसाच्या मेजवाण्या झडू लागल्या आहेत. मंदिर परिसरातील वनराईत मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. तर काही ठिकाणी चुली पेटल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिर्थक्षेत्र परिसरातील हे ओपन बार थांबवणार कोण ? असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित होत आहे.
श्री घाटाई देवीच्या यात्रेला प्रतिवर्षी लाखो भाविक येतात, तर दरदिवशी भाविक आणि पर्यटक भेट देत असतात. देवस्थान विश्वस्तांच्या माध्यमातून देवीच्या भव्य मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. मंदिर आणि परिसर सुशोभिकरणाचे कार्य अजूनही चालूच आहे; मात्र काही मद्यपी देवीच्या परिसरातील सात्त्विकतेचा आणि एकांताचा अपलाभ घेत आहेत. या मद्यपींना आवरण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी भाविक-भक्तांकडून होत आहे.