सज्ञानी तरुण आणि तरुणी सहमतीने विवाह करत असतील, तर पोलीस त्यांची चौकशी करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा आदेश !

सज्ञानी असतांनाही फूस लावून जर कुणी बलपूर्वक विवाह करण्यासाठी दबाव टाकत असेल किंवा विवाह करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने द्यावा, असे जनतेला वाटते !

नवी देहली – जर सज्ञान तरुण आणि तरुणी सहमतीने विवाह करत असतील, तर पोलीस त्यांची चौकशी करू शकत नाही. त्यांना ‘पालकांकडून यासाठी अनुमती घेतली आहे का ?’, असेही पोलीस विचारू शकत नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांनी आरोप केला की, पोलीस अधिकारी त्यांना पुन्हा कर्नाटकात बोलावण्यासाठी बाध्य करत आहेत आणि यातील तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची धमकी देत आहेत.

न्यायालयाने पुढे म्हटले की, दांपत्याने विवाह प्रमाणापत्र दाखवले, तर पोलिसांनी त्यांच्या विरोधातील तक्रार रहित केली पाहिजे. पोलिसांनी जबानी देण्यासाठी धमकी देऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलावणे कायद्याच्या विरोधात आहे.