सातारा, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील सातारा-रहिमतपूर रस्त्यावर आशा भवन नावाची विशेष मुलांची शाळा आहे. या शाळेतील १५ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शाळा व्यवस्थापनाने कोरोना बाधितांसाठी शाळेमध्येच स्वतंत्र कोविड कक्षाची तातडीने स्थापना केली असून बाधितांपैकी ५ विद्यार्थ्यांना जम्बो कोविड सेंटरमध्ये भरती करावे लागले आहे.
राज्यशासनाने ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग चालू करण्याची अनुमती शाळांना दिल्यावर शाळा योग्य त्या उपाययोजना करून शाळा भरवत आहेत. सातारा-रहिमतपूर रस्त्यावर असलेली विशेष मुलांची शाळा आशा भवन ही याच पद्धतीने चालू करण्यात आली होती. चिंचनेर येथील आरोग्य केंद्रात या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांची तपासणी करण्यात आल्यावर १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
आशा भवनात परदेशातील फादर आणि नन्स यांची ये-जा !आशा भवन या विशेष मुलांच्या शाळेत परदेशातील फादर आणि नन्स यांची ये-जा असते. ते स्वतःची योग्य ती काळजी घेत असतील का ? याविषयी स्थानिकांच्या मनात शंका आहे. फादर आणि नन्स यांच्या येण्या-जाण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवल्यास ही स्थिती आटोक्यात येईल, असे स्थानिकांचे मत आहे. (कोरोनावर आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे का, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. प्रशासनाने याचे उत्तर द्यायला हवे. – संपादक) |