मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगून ब्रिटीशकालीन वडाचे झाड कापले

५ जणांना अटक

महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून भरदिवसा अपप्रकार करण्याचे धारिष्ट्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच इतरांना जरब बसेल !

होर्डिंग्जला अडथळा म्हणून ब्रिटिशकालीन वडाच्या झाडाची बेकायदेशीर तोड

मुंबई – रस्त्याच्या कडेला असलेल्या विज्ञापनाच्या फलकाचे अधिक पैसे मिळावे म्हणून गिरगाव चौपाटीजवळील असलेले ब्रिटीशकालीन वडाचे झाड कापणार्‍या ५ जणांना पोलिसांनी माहीम परिसरातून अटक केली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे या आरोपींनी स्थानिकांनी सांगितले होते. विज्ञापन फलक लावल्यानंतर हे झाड मध्ये येत असल्याने पैसे अल्प मिळत होते. त्यामुळे आरोपींनी झाड कापले.

या प्रकरणी स्थानिकांना संशय आल्याने याविषयी एक ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले होते. याची नोंद स्वत: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. आदित्य ठाकरे स्वतः झाड कापलेल्या ठिकाणी गेले. महानगरपालिकेला विचारणा केल्यावर असा कुठलाही आदेश दिला नसल्याने झाड कापणारे लोक हे महानगरपालिकेचे कर्मचारी नव्हते, हे लक्षात आले.

मुंबईमध्ये अशी अनेक झाडे कापण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिल परिसरामध्येही या लोकांनी अशाच प्रकारे झाडे कापल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.