कोल्हापूर, ६ फेब्रुवारी – राज्यशासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानात पुणे क्षेत्रीय विभागातून २८० गुणांसह कोल्हापूर जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. याच अभियानात कागल आणि गडहिंग्लज पंचायत समितीने अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्या खालोखाल माढा (जिल्हा सोलापूर), शिराळा (जिल्हा सांगली) फलटण, कोरेगांव (जिल्हा सातारा) या पंचायत समित्यांना गुण मिळाले आहेत.
या प्रस्तावाच्या छाननीकरता विभागीय आयुक्त पुणे यांनी विविध समित्यांची स्थापना केली होती. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी घुले यांच्या नेतृत्वाखालील समितीची निवड कोल्हापूरची पहाणी करण्यासाठी झाली होती. या अभियानातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूरसह दोन्हीही विजेत्या पंचायत समितीचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.