मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून प्रारंभ होणार

८ ते १८ मार्च या काळात सुनावणी पूर्ण होणार

नवी देहली – महाराष्ट्र सरकारने ५ फेब्रुवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी चालू करण्याची मागणी केल्यावर न्यायालयाने येत्या ८ मार्चपासून मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच होणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. ८ मार्च ते १८ मार्च या कालावधीत ही सुनावणी पार पडणार आहे.

८, ९ आणि १० मार्च या तारखांना याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. १२, १५, १६ आणि १७ मार्च या तारखांना राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला असून त्यांची बाजू ऐकली जाईल. १८ मार्चला काही नवीन सूत्रे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होईल. त्याचदिवशी केंद्र सरकारची बाजू ऐकली जाईल, म्हणजे केवळ १० दिवसांत संपूर्ण प्रकरणावरील सुनावणी पार पडणार आहे.