‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
दृष्ट काढण्यासंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या कार्यात अडथळे आणण्यासाठी अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांवर सतत आक्रमण करतात. यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना विविध प्रकारचे शारीरिक त्रास होतात. त्यांना होणारे त्रास दूर व्हावे, यासाठी एका उन्नतांनी अभिमंत्रित करून दिलेल्या मातीच्या मडक्याने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची दृष्ट २५.१२.२०१९ या दिवशी काढली. ‘दृष्ट काढल्यानंतर अभिमंत्रित केलेल्या मातीच्या मडक्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या मडक्याची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – अभिमंत्रित केलेल्या मातीच्या मडक्याने दृष्ट काढल्यानंतर त्या मडक्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : आरंभी (दृष्ट काढण्यापूर्वी) मडक्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती. मडक्याने परात्पर गुरु डॉक्टरांची दृष्ट काढल्यानंतर त्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये पुष्कळ प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्या, हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
२. निष्कर्ष
दृष्ट काढल्यानंतर मडक्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. दृष्ट काढल्याने व्यक्तीचा स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) दूर होणे : व्यक्तीला दृष्ट लागल्याने तिच्याभोवती रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) निर्माण होते. त्यामुळे तिचा स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. ज्या वेळी व्यक्तीचा स्थूलदेह रज-तमात्मक स्पंदनांनी भारित होतो, त्या वेळी ती शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. शारीरिक व्याधींमध्ये तीव्र डोकेदुखी, कान ठणकणे, डोळे दुखणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायांना मुंग्या येणे, छातीत धडधडणे, हात-पाय गार पडून गळून जाणे इत्यादी त्रास होतात. दृष्ट काढल्याने तिच्या स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण दूर होते. यामुळे व्यक्तीला होणारा त्रास उणावतो किंवा नाहीसा होतो.
३ आ. दृष्ट काढल्यानंतर मडक्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : परात्पर गुरु डॉक्टरांची मडक्याने दृष्ट काढल्याने त्यांच्या भोवतीची त्रासदायक स्पंदने मडक्यामध्ये खेचली गेली. त्यामुळे मडक्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे अनिष्ट शक्तींची परात्पर गुरु डॉक्टरांवर होणारी आक्रमणे अतिशय तीव्र स्वरूपाची असल्यामुळे त्यांपासून होणारे त्रास दूर होण्यासाठी उन्नतांनी मडके अभिमंत्रित करून दिले. यामुळे दृष्ट काढण्यापूर्वी त्या मडक्यामध्ये पुष्कळ (२२.२१ मीटर) सकारात्मक ऊर्जा आढळली. दृष्ट काढल्यानंतर मात्र मडक्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यातून परात्पर गुरु डॉक्टरांवर होणारी अनिष्ट शक्तींची आक्रमणे किती जीवघेणी असतात, हे लक्षात येते.’
– प्रा. सुहास जगताप, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२०)
ई-मेल : [email protected]