धारवाड (कर्नाटक) येथून आणखी ४ आरोपींना अटक

नांदेड येथील शंकर नागरी सहकारी बँकेवर ‘ऑनलाईन’ दरोडा घातल्याचे प्रकरण

नांदेड – शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आर्.टी.जी.एस्.च्या माध्यमातून ‘हॅकर्स’ने पळवले होते. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य संबंध उघड झाले आहेत. नांदेड गुन्हे शाखेने आणखी ४ आरोपींना कर्नाटकच्या धारवाड गावातून कह्यात घेऊन अटक केली. यापूर्वी ६ जणांना अटक झाली असून एकूण आरोपींची संख्या १० झाली आहे.

‘सायबर सेल’च्या माध्यमातून हे अन्वेषण युगांडा देशातील एका आरोपीपर्यंत पोचले. रूमानिका रोनॉल्ड पी किटा सिबवा, मोनुके केनेडी नेबुतो, गलाबुजी मुकिसा रॉबर्ड पी गलाबुजी फेड आणि प्रियंका पी. गोविंद अप्पा सावनू माळवदे (हुबळी) अशी आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून २ भ्रमणसंगणक, ६ भ्रमणभाष, २ डोंगल, ८ चेकबूक, ५ पासबूक, १३ डेबिट कार्ड असे साहित्य पथकाने जप्त केले. आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.