नाशिक जिल्ह्यातील कातरणी ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रहित

ही आहे जगातील एका मोठ्या  लोकशाही राज्यपद्धतीची निरर्थकता !

नाशिक – जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रहित करण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याविषयीचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबवण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रहित करण्यात आली आहे. याविषयीची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी २९ जानेवारीला येथे केली.

मदान यांनी सांगितले की, कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून सर्व ११ जागांवर लिलावाच्या माध्यमातून सकृतदर्शनी उमेदवार बिनविरोध निवडून येतांना दिसत होते. त्यामुळे आयोगाने हे निकाल घोषित करण्यास मनाई केली होती. लिलावाच्या तक्रारीची नोंद घेऊन आयोगाने नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागविला होता. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदींचे अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनीफितीमधील संभाषणाचे आयोगाने अवलोकन केले. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे प्रकरण ९-अ नुसार अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्याचे मदान यांनी सांगितले.