देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !

नवी देहली – देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी केली आहे. यामध्ये योगेंद्र यादव, बलबीर राजेवाल, बलदेवसिंह सिरसा, डॉ. दर्शनपाल या शेतकरी नेत्यांचा समावेश आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे. पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

१. पोलिसांनी नोटिसीमध्ये म्हटले आहे की, शेतकरी नेत्यांचा देहली पोलिसांसमवेत झालेला करार का मोडण्यात आला ? शेतकरी नेत्यांनी ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये सर्वांत पुढे असणे आवश्यक होते. आंदोलनात केवळ ५ सहस्र ट्रॅक्टरला अनुमती देण्यात आली होती. ट्रॅक्टर मोर्च्याची वेळ दुपारी १२ वाजताची निश्‍चित करण्यात आली होती; परंतु त्यापूर्वीच ट्रॅक्टर मोर्च्याला प्रारंभ करण्यात आला. काही समाजकंटकांनी मंचावर नियंत्रण मिळवून चिथावणीखोर भाषणेही दिली. यासाठी उत्तरदायी धरून शेतकरी नेत्यांवर कारवाई का केली जाऊ नये ?’, अशी विचारणा यामध्ये करण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी त्यांना ३ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

(सौजन्य : Republic)

२. दुसरीकडे सिंघु, टिकरी आणि गाझीपूर या देहलीच्या सीमांवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन चालूच आहे. आंदोलनकर्त्यांची संख्या अल्प झाली असली, तरी आंदोलक त्यांच्या निश्‍चयावर ठाम आहेत.