आवाडे येथे पुलावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी
दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी धरणाचा उजवा तीर कालवा खानयाळे येथे फुटला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे नदीला पूर येऊन पुलावर पाणी आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. पाण्याची पातळी वाढल्यास येथील घरे पाण्याखाली जाण्याची भिती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून शेतकर्यांनी अनेकदा सांगूनही कालव्याच्या कामाकडे जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केले. तिलारी धरण विभागाचा मनमानी कारभार या घटनेमुळे उघड होत असून कालव्याच्या निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे कालव्याचे काम केलेल्या ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच त्याचे नाव काळ्या सूचीत टाकावे, अशी मागणी होत आहे. (काम निकृष्ट होत असल्याचे जनतेच्या लक्षात येते; मात्र प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ? कि ठेकेदाराशी लागेबांधे असल्याने अधिकारी अशा कामांकडे दुर्लक्ष करतात, असे जनतेने समजावे ? या आरोपांची चौकशी करून प्रशासनाने जनतेला न्याय द्यावा, ही अपेक्षा ! – संपादक)