सावंतवाडी – तालुक्यातील रेडी येथील बंद पडलेल्या टाटा मेटालिक कंपनीच्या जागेत नवीन प्रकल्प चालू करा अन्यथा शेतकर्यांच्या घेतलेल्या भूमी त्यांना परत करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान सदस्य प्रीतेश राऊळ यांनी केली आहे.
टाटा मेटालिक कंपनी बंद झाल्याने येथील स्थानिकांचा रोजगार बंद झाला. या बंद झालेल्या आस्थापनाच्या ठिकाणी दुसरा प्रकल्प चालू करावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. या अनुषंगाने प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सक्षम अधिकारी आले नव्हते. नवीन प्रकल्प चालू करण्यासाठी आंदोलन करण्याची चेतावणी देऊनही प्रशासनाने त्याची नोंद घेतली नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला. त्यामुळे एकतर रोजगार द्या अन्यथा शेतकर्यांना त्यांच्या भूमी परत कराव्यात, अशी राऊळ यांनी मागणी केली आहे.
या वेळी रेडीचे सरपंच रामसिंग राणे, सदस्य विनोद नाईक आदी उपस्थित होते.