पणजी, २५ जानेवारी (वार्ता.) – राज्यातील गोवा माईल्स या अॅपवर आधारित टुरिस्ट टॅक्सीसेवेच्या अस्तित्वावर बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे उत्तर गोवा टुरिस्ट टॅक्सी संघटनेने गोवा माईल्स ही सेवा रहित करण्यासाठी शासनाला १५ दिवसांचा कालावधी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मायकल लोबो यांनी ही भूमिका घेतली आहे. यामुळे गोवा माईल्सचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मंत्री मायकल लोबो म्हणाले, गोवा माईल्स सेवेला दाबोळी विमानतळावर काऊंटर का देण्यात आला आहे ? ही सेवा अॅपवर आधारित असल्याने प्रवासी अॅपच्या माध्यमातून या सेवेचा काऊंटरशिवाय सहजतेने लाभ घेऊ शकतात. या सेवेमुळे पारंपरिक टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सर्व टॅक्सीचालक गोवा माईल्स मध्ये सहभागी होणार असे गृहित धरून या सेवेला प्रारंभ केला; मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. यामुळे टॅक्सीचालक आणि गोवा माईल्स यांच्यामध्ये भांडणे मात्र होऊ लागली. स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोवा माईल्स सेवा सत्ताधारी आमदारांना विश्वासात न घेताच लागू केली आणि आम्हाला आता अडचणीत आणले.
गोवा माईल्स ही खासगी स्तरावरील अॅपवर आधारित टुरिस्ट टॅक्सीसेवा योजना माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी ६ ऑगस्ट २०१८ मध्ये कार्यान्वित केली होती.
कोणत्याही परिस्थितीत गोवा माईल्सची सेवा बंद पडू देणार नाही ! – व्यवस्थापकीय संचालक, गोवा माईल्स
पणजी – कोणत्याही परिस्थितीत गोवा माईल्सची सेवा बंद पडू देणार नाही, असा दावा गोवा माईल्सचे व्यवस्थापकीय संचालक पराशर पै खोत यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. मंत्री मायकल लोबो यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकीय संचालक पराशर पै खोत यांनी हा दावा केला.
ते पुढे म्हणाले, गोवा माईल्सला कंत्राट मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी विद्यमान मंत्री मायकल लोबो आणि विद्यमान मंत्री नीलेश काब्राल यांना बोलावून घेऊन त्यांचे याविषयी मत विचारले होते. त्या वेळी दोघांनीही याविषयी त्यांना कोणतीच समस्या नसल्याचे सांगितले होते. राज्यात २५ सहस्र टुरिस्ट टॅक्सी आहेत आणि शासनाने या सर्व टॅक्सींना टॅक्सी मीटर बसवल्यास पुढे भांडणे होणार नाहीत.