विवाहित महिलेसमवेत रहाणे ‘लिव्ह इन’ नाही, तर व्यभिचाराचा गुन्हा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !

अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – विवाह झालेला असतांना दुसर्‍या पुरुषासमवेत पती-पत्नीसारखे रहाणे म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशन’ होत नाही, तर तो व्यभिचाराचा गुन्हा आहे. यासाठी पुरुष गुन्हेगार ठरतो, असा आदेश येथील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने या वेळी हाथरस जिल्ह्याच्या ससनी येथील आशा देवी आणि अरविंद यांची याचिका फेटाळली. आशा देवी यांचा विवाह महेशचंद्र यांच्यासमवेत झाला होता. दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही. तरीही आशादेवी या पतीपासून वेगळ्या होऊन दुसर्‍या पुरुषासमवेत एकत्र रहात आहेत. आशा देवी या महेशचंद्र यांच्या विवाहित पत्नी आहेत. तरीही ती अरविंदसोबत पती-पत्नीसारखी रहाते. आशा देवी यांनी याचिकेमध्ये म्हटले होते की, आम्ही दोघे ‘लिव्ह इन’मध्ये रहात आहोत. आम्हाला आमच्या कुटुंबियांपासून सुरक्षा द्यावी.

न्यायालयाने म्हटले की, विवाह झालेल्या महिलेसमवेत धर्म पालटून रहाणे हादेखील गुन्हा आहे. अवैध संबंध ठेवणारा पुरुष गुन्हेगार आहे. संरक्षण देण्याचा आदेश केवळ कायदेशीर गोष्टींसाठी देता येतो. कोणत्याही गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी नाही. असे झाले तर तो गुन्हेगाराला संरक्षण दिल्यासारखे असेल.