‘१०.९.२०२० या दिवशी मी नामजप करत होते. त्या वेळी माझ्या मनात अनावश्यक विचार चालू होते. माझे मन नामजपावर एकाग्र होत नव्हते. थोड्या वेळाने माझ्या मनात विचार आला, ‘नामजप एकाग्रतेने करणे’ परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित आहे. त्यासाठी मी प्रयत्न करायला हवेत.’ ‘मनात विचार येऊ नयेत’, यासाठी मी जलद गतीने नामजप करू लागले. तेव्हा मला पुष्कळ त्रास झाला. त्यानंतर देवाने मला पुढील ज्ञान दिले.
१. साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास होण्यामागील कारणे
अ. जेव्हा साधकांचे स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात, तेव्हा साधक काहीच प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती त्याचा लाभ घेते. त्यामुळे तो त्रास वाईट शक्तींच्या इच्छेने झालेला असतो.
आ. जेव्हा साधकांचे स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात, तेव्हा साधक ‘भगवंत किंवा गुरु यांना काय अपेक्षित आहे ?’, याचा विचार करून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी साधकाला त्रास देणार्या वाईट शक्तीला ते आवडत नाही, तिला राग येतो. तो त्रास ईश्वरेच्छेने झालेला असतो.
‘हे गुरुमाऊली, ‘आपण या अज्ञानी जिवाला ही अनुभूती आणि ज्ञान दिले’, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. भगवंताला (गुरूंना) अपेक्षित असे विचार आणि कृती करण्यासाठी प्रयत्न करणे, याचे अनन्यसाधारण महत्त्व माझ्या लक्षात आले. गुरुमाऊली, मी अज्ञानी आणि असमर्थ आहे, तरी ‘आपल्याला काय अपेक्षित आहे ?’, हे या जिवाला कळू दे. तुम्हाला अपेक्षित असे विचार आणि कृती करण्याचा ध्यास मला प्रत्येक क्षणी लागू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |