जागतिक हवामानात पालट !

अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून कमलादेवी हॅरिस यांनी त्यांच्या पदांची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर बायडेन यांनी लगेचच १७ अध्यादेशांवर स्वाक्षरी करत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय पालटले. यांतील काही निर्णय अमेरिकाच नाही, तर संपूर्ण जग आणि पृथ्वी यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. यातून रिपब्लिक पक्ष आणि डेमोक्रेटिक पक्ष यांच्यातील धोरणात्मक निणर्यांमध्ये किती विरोधाभास होता, हे लक्षात येते. बायडेन यांनी ट्रम्प यांच्या निर्णयांमध्ये केलेल्या पालटांमध्ये, पॅरिस हवामानपालट करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणे, वर्णद्वेष संपवणे, अमेरिका आणि मॅक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रहित करणे आणि या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवणे, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होणे, इस्लामी आणि आफ्रिकी देशांवर घातलेली बंदी हटवणे, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देणेे आदी महत्त्वाचे निर्णय अंतर्भूत आहेत. यातून बायडेन यांचा कारभार कशा प्रकारे चालणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. बायडेन हे मवाळ, तर ट्रम्प हे जहाल विचारसरणीचे आहेत. ट्रम्प यांनी इस्लामी आतंकवाद आणि इस्लामी राष्ट्रे यांची दादागिरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सीरियामधील इस्लामिक स्टेटचे अस्तित्व संपवण्याचे मोठे काम ट्रम्प यांनी केले, हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यातच विस्तारवादी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनवर वचक बसवण्यासाठी केलेले प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने भारताला केलेले सैनिकी साहाय्यही महत्त्वाचे आहे. ट्रम्प कितीही वाचाळ होते, तरी भारतासाठी ते काही प्रमाणात पुरक ठरले, हेही नाकारता येणार नाही. भविष्यात चीनकडून असणारा धोका लक्षात घेता बायडेन याविषयी काही निर्णय घेतील, अशी अपेक्षा ठेवावी लागेल आणि बायडेन यांना ती पूर्ण करण्यावर विचार करावाच लागेल. बायडेन हे चीनविषयी मवाळ असल्याचे त्यांचे आतापर्यंतचे धोरण असल्याचे दिसून आले आहे. यावरच बोट ठेवत निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर आरोपच केला होता, ‘बायडेन जिंकले, तर अमेरिकेवर चीनचे नियंत्रण असेल.’ बायडेन असे काही होऊ देणार नाही, अशी अपेक्षा अन्यथा अमेरिकेवर चीनचे अप्रत्यक्ष नियंत्रण आले, तर संपूर्ण जग चीनच्या कह्यात जायला वेळ लागणार नाही. बायडेन प्रशासन असे करणार नाही, अशी अपेक्षा.

पॅरिस करारात सहभाग अपेक्षित !

बायडेन यांनी महत्त्वाच्या घेतलेल्या निर्णयामध्ये पॅरिस हवामान पालट करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याचा करार एक आहे. ‘या करारामुळे अमेरिकेला कोणताही लाभ होणार नाही, उलट त्याची हानी होईल’, असे म्हणत ट्रम्प यातून बाहेर पडले होते; मात्र आता बायडेन यांनी यात पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ५५ टक्के प्रदूषणास कारणीभूत असणार्‍या ५५ देशांनी स्वाक्षर्‍या केल्यावर हा करार अस्तित्वात आला. ४८ टक्के प्रदूषण करणार्‍या अमेरिका, चीन, ब्राझिल आदी ६० देशांनी पहिल्या टप्प्यात या करारावर स्वाक्षर्‍या केल्या; मात्र अमेरिकेने नंतर नकार दिला. ट्रम्प यांच्या निर्णयाचा त्या वेळी फ्रान्सने विरोध केला होता. ‘या विषयावर कोणताही दुसरा पर्याय असू शकत नाही; कारण आपल्याकडे वास्तव्यासाठी दुसरी पृथ्वी, दुसरे जग असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही,’ असे फ्रान्सच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेचा वापर केला होता. याला विरोध करतांना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘मेक अवर प्लॅनेट ग्रेट अगेन’, असे म्हटले होते. ट्रम्प यांचा हा निर्णय चुकलाच होता. जगातील प्रदूषणाचा प्रश्‍न जीवन मरणाचा बनला असतांना अशा प्रकारचा संकुचित विचार ट्रम्प यांनी केला होता. आता बायडेन यांनी चूक सुधारली हे चांगलेच झाले. अमेरिकेकडून ४८ टक्के प्रदूषण केले जाते, यावर आता बायडेन उपाययोजना काढतील, अशी अपेक्षा.

आत्मघाती मानवता !

ट्रम्प यांचे सर्वच निर्णय चुकीचे होते आणि बायडेन यांनी ते रहित करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे म्हणता येणार नाही; कारण ट्रम्प यांनी इस्लामी आणि आफ्रिकी देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती, ती बंदी बायडेन यांनी उठवली आहे. यामागे मानवतावादी विचार आहे, तसेच ‘कुणाची घृणा करता येणार नाही’, असा विचार बायडेन यांनी केला आहे. मानवतेच्या दृष्टीने असा विचार करणे कदापी चुकीचे ठरणार नाही; मात्र हीच मानवता आज युरोपला किती हानीकारक ठरत आहे, हे दिसत आहे. मध्य-पूर्वेतील यादवीमुळे सहस्रो मुसलमान शरणार्थींना युरोपने आश्रय दिला; मात्र आता हेच शरणार्थी धर्मांध या देशांना तापदायक ठरू लागले आहेत. तेथील संस्कृती, शांतता, कायदा आणि सुव्यवस्था यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. काही इस्लामी देशांमध्ये अमेरिकाद्वेष आहे. त्यामुळे या शरणार्थींच्या माध्यमांतून अमेरिकेवर जिहादी आक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही आठवड्यांपूर्वी फ्रान्समध्ये एकापाठोपाठ झालेल्या काही जिहादी आक्रमणांमध्ये आक्रमणकर्ते जिहादी अन्य देशांतून फ्रान्समध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी बायडेन यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरू नये, असेच म्हणावेसे वाटते. ही मानवता अमेरिकेला भारी पडू शकते. यावर बायडेन यांनी विचार करणे आवश्यक आहे.

मैत्रीपर्व कायम रहावे !

बायडेन यांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांतून ‘ते द्वेषपूर्ण कारभार करणार नाहीत’, असे त्यांनी दाखवून दिले आहे. यामुळे भारताविषयीही ते मानवतेने वागतील, अशी अपेक्षा आहे. भारतियांना अमेरिकेत शिक्षण आणि नोकरी यांनिमित्त व्हिसा मिळण्याच्या प्रक्रिया ट्रम्प यांनी कठोर केली होती, ती बायडेन शिथिल करतील, अशी अपेक्षा. तसेच चीनला घेरण्यासाठी दक्षिण हिंद महासागर आणि दक्षिण चीन सागर येथील अमेरिकेच्या नौदलाचे अस्तित्व कायम ठेवतील, अशी अपेक्षा. तसेच रशियाकडून एस् ४०० ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा विकत घेण्यास भारताला ट्रम्प यांनी जसा विरोध केला, तसा बायडेन विरोध करणार नाहीत, अशी अपेक्षा. तसेच ट्रम्प यांच्या काळात जे मैत्रीपर्व निर्माण झाले होते, ते कायम राहील, अशी अपेक्षा !