कोरेगाव भीमा लढाईविषयी माहिती सांगणार्या ‘कोरेगाव (भीमा) शौर्य दिवस – सत्य कि विपर्यास’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम
पुणे – कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी १८१८ या दिवशी झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध एक विशिष्ट जाती समूह यांच्यात झालेली नव्हती. तसे कोणतेही पुरावे इंग्रजांच्या तत्कालीन नोंदींमध्ये नाहीत. महाराष्ट्र, गुजरातसह बराचसा मोठा भाग इंग्रजांच्या गुलामगिरीत ढकलणारी ही घटना शौर्यदिन म्हणून साजरी करणे चुकीचे आहे. ही समतेची लढाई नव्हती. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एका जाती समूहाने २८ सहस्र पेशवे सैनिकांना कापले, हा इतिहास खोटा असल्याचे वक्तव्य अधिवक्ता शिवाजी कोकणे यांनी केले आहे. कोकणे यांनी लिहिलेल्या ‘कोरेगाव (भीमा) शौर्य दिवस – सत्य कि विपर्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी जयस्तंभाचे परंपरागत व्यवस्थापक कॅप्टन (नि.) बाळासाहेब जमादार-माळवदकर, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
या वेळी कोकणे म्हणाले की, ३ वर्षांच्या अभ्यासानंतर हे पुस्तक मी लिहिले असून इंग्रजांचे अभिलेख, संदर्भ साहित्य, पत्रव्यवहार आदींचा अभ्यास केला आहे.
कोरेगाव भीमा येथील हिंसात्मक लढाईचा जातीशी संबंध नसल्याचे प्रतिपादन !
‘वर्ष १८२२ मध्ये तेथे जयस्तंभ उभारण्यात आला. या लढाईत शहीद आणि घायाळ झालेल्यांची नावे जयस्तंभावर लिहिण्यात आलेली आहेत. या लढाईत प्रत्यक्ष सहभागी असलेले खंडोजी जमादार-माळवदकर यांचा मी सहावा वंशज आहे. त्यांना ब्रिटिशांनी जयस्तंभाचा प्रमुख म्हणून नेमले होते. ‘या ठिकाणी धार्मिक कृती करू देऊ नका. तशी कृती घडल्यास जमादार आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल’, असे आदेश इंग्रजांनी आम्हाला दिलेले होते. तरीसुद्धा याठिकाणी प्रतीवर्षी शौर्यदिवस साजरा केला जातो. ‘या लढाईचा कोणत्याही जातीशी संबंध नाही’, असे जयस्तंभाचे परंपरागत व्यवस्थापक कॅप्टन (नि.) बाळासाहेब जमादार-माळवदकर यांनी सांगितले.