प्रेमळ आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असणार्‍या कु. अनुराधा जाधव !

​‘मार्गशीर्ष पौर्णिमा (२९.१२.२०२०) या दिवशी फोंडा, गोवा येथील साधिका कु. अनुराधा जाधव यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त नातेवाईक आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत . . .

कु. अनुराधा जाधव

१. सौ. मनाली भाटकर

१ अ. कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे : अनुराधाताई घरातील आणि अधिकोषातील कामे, आईचे औषध आणणे, या सेवा मनापासून आणि आनंदाने करते.

१ आ. साधकांशी जवळीक साधणे : तिला गोव्यातील प्रसाराची सेवा मिळाल्यावर तिला येथील साधक आणि गावे सर्वच नवीन होते, तरी तिने अल्प कालावधीत साधकांशी जवळीक साधून त्यांना सेवेत सहभागी करून घेतले. त्या वेळी एका भागातील प्रसाराची स्थिती फारशी चांगली नव्हती. ताईने तेथील साधकांना ‘ते कुठे अल्प पडत आहेत ? त्यांनी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, याची जाणीव करून दिली आणि ‘सर्व साधक सेवेत सहभागी व्हावेत’, यासाठी तिने प्रयत्न केले. आता तेथील साधक ध्येय घेऊन प्रयत्न करत आहेत.

१ इ. तत्त्वनिष्ठ : ताई तत्त्वनिष्ठतेने साधकांच्या चुका सांगते, तसेच ‘साधकांना त्या चुकांची खंत वाटून त्यांच्याकडून त्या चुका पुन्हा न होण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे ?’, हे त्यांना समजावून सांगते.

१ ई. नेतृत्वगुण : ताई सत्संगात पुढाकार घेऊन सूत्रे मांडते. ‘साधकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न वाढावेत’, यासाठी ती तळमळीने साधनेविषयीची सूत्रे सांगते. ती साधकांचा चिकाटीने पाठपुरावाही करते. ती ‘साधकांमध्ये असलेलेे स्वभावदोष आणि ते घालवण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, हे अचूक ओळखते अन् त्यानुसार त्या साधकांना मार्गदर्शन करते. त्यामुळे साधकांचा उत्साह वाढून साधक साधनारत होत आहेत.

२. श्री. सत्यविजय नाईक  

२ अ. उत्तम निरीक्षणक्षमता : एकदा एका कार्यशाळेचे आयोजन करायचे होते. त्याच्या आदल्या दिवशी सेवेतील साधक पूर्वसिद्धता करून घरी गेले होते. त्यानंतर साधकांनी केलेली सेवा पहायला गेल्यावर ताईने ‘तेथे स्पंदने चांगली येत नाहीत’, असे सांगितले आणि लगेच काही पालटही सांगितले. तेथे असलेल्या साधकांनी ते पालट त्वरित केले. त्यानंतर तेथील स्पंदने पालटली.

२ आ. प्रेमभाव : ताई साधकांना त्यांच्या चुका सांगतांना ‘साधकांना साहाय्य झाले पाहिजे आणि साधकांनी चांगले प्रयत्न करायला हवेत’, या दृष्टीने सांगते. ती सर्वांशी मनमोकळेपणाने बोलते. सर्वांना तिच्याविषयी जवळीक वाटते.

३. सौ. वेदिका पालन

३ अ. साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना साहाय्य करणे : ताईने दिलेल्या सेवा करतांना काही वेळा साधकांना अडचणी येतात. तेव्हा ताईला अडचणींविषयी सांगितल्यावर ती शांतपणे समजून घेते आणि त्यावर उपाययोजना सांगते. त्यामुळे ताईला अडचणी सांगतांना साधकांना ताण येत नाही. ‘आमच्याकडून सेवा पूर्ण झाली नाही’, असे तिला सांगतांनाही साधकांना ताण येत नाही. ती साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना साहाय्य करते.

३ आ. सहजतेने बोलणे : सत्संगात ताण वाटत असल्यास ताई बोलल्यावर वातावरणात पालट होतोे. तिच्यातील सहजतेमुळे तिच्याशी कोणताही विषय बोलतांना ताण येत नाही. ती आमच्या घरी पहिल्यांदा रहायला आली असतांनाही घरातील एका सदस्याप्रमाणे सहजतेने वावरत होती. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही तिच्याविषयी आपुलकी वाटली.

३ इ. सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ

१. एखादी सेवा करतांना त्यात पुनःपुन्हा पालट करावे लागतात. काही वेळा उत्तरदायी साधक त्यात अनेक पालट सुचवतात. तेव्हा ती उत्तरदायी साधकांना अपेक्षित अशी सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पुष्कळ वेळा साधकांचा सेवेसाठी पुनःपुन्हा पाठपुरावा करावा लागतो. त्या वेळी ती शांतपणे आणि संयमाने पाठपुरावा करून सेवा परिपूर्ण करते.

२. ती प्रत्येक सेवेतून गुरुदेवांचे मन जिंकायचा प्रयत्न करते. प्रत्येक कार्यक्रम चालू होण्याच्या आधी ‘सर्व सिद्धता झाली आहे ना ?’, याची ती स्वतः निश्‍चिती करून घेते. त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमात ती स्वत: काही वेळ देऊन ‘व्यवस्थित चालू आहे ना ?’, हे पहाते आणि आवश्यक ते पालटही सुचवते.

३ ई. प्रेमभाव : दळणवळण बंदी चालू झाल्यावर आम्ही एकमेकांना भेटत नव्हतो. तेव्हा ती मधून मधून ‘व्हिडिओ कॉल’ करायची. त्यामुळे ‘आम्ही जवळच आहोत’, असे वाटायचे. सणाच्या दिवशी ती साधिकांना चांगले सिद्ध होऊन छायाचित्र पाठवायला सांगते. सणाच्या दिवशी ती आम्हाला ‘घरी गोड पदार्थ केले ना ?’, हे आवर्जून विचारते. ती स्वतः कविता करून साधकांना शुभेच्छा देते.

३ उ. तत्त्वनिष्ठता : साधक सत्संगात कधी कधी प्रतिसाद देत नाहीत किंवा त्यांचा अपेक्षित असा सहभाग नसतो. तेव्हा ती शांतपणे आणि तत्परतेने त्याची जाणीव करून देते.

३ ऊ. साधकांना घडवणे

३ ऊ १. साधिकेला सत्संगाची सूत्रे सांगून सत्संग घ्यायला सांगणे : एकदा एका सत्संगाच्या वेळी तिने ‘सूत्रे कशी सांगायची ?’, हे मला आधीच सांगितले आणि मला सत्संग घ्यायला सांगितला. सत्संग चालू असतांना ती मधून मधून मला भ्रमणभाषवर संदेश पाठवून ‘एखाद्या सूत्रासंदर्भात कसे सांगावे ?’, याची दिशा देत होती. सत्संग झाल्यावर ‘मी अजून कसे बोलायला हवे होते ?’, हे तिने मला सांगितले. त्यामुळे ‘सत्संगातून कसा आनंद घ्यायचा ?’, हे मला शिकता आले.

३ ऊ २. युवा साधकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना साहाय्य करणे : ‘प्रत्येक साधकाने प्रगती करायला पाहिजे’, यासाठी ती सातत्याने प्रयत्न करते.  तिला युवा साधकांना पुढे घेऊन जाण्याची फार तळमळ आहे. ती स्वतःहून युवा साधकांना वैयक्तिक संपर्क करते. ती त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक ते साहाय्य करते. राज्यात आधी युवा साधक कृतीशील नव्हते. आता काही जण नियमित सेवा करू लागले आहेत. तिने त्यांच्यात साधनेची गोडी निर्माण केली.

३ ऊ ३.  प्रत्येक मोहिमेचे नियोजन करतांना ‘त्यात सर्वांचा सहभाग होईल’,  या दृष्टीने ती प्रयत्न करते.

४. सौ. ज्योत्स्ना जगताप

४ अ. साधकांशी जवळीक साधणे

१. अनुराधाताई आमच्या घरी आल्यावर आपलेपणाने वागते. माझी आणि तिची आधी फारशी ओळख नव्हती. आम्ही गोव्यात आल्यावर आमची ओळख झाली. तिच्या सहज वागण्यामुळे आणि आपलेपणामुळे माझी तिच्याशी लगेच जवळीक साधली गेली.

२. तिला सेवेविषयी काही सूत्र विचारल्यास ती नीट अभ्यास करून उत्तर देते. तिला कोकणी भाषा येत नाही, तरी ती साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना साहाय्य करते.

३. तिला कधी भ्रमणभाष केल्यास ती घरातील सर्वांची विचारपूस करते. ती स्वतःहून सगळ्यांशी बोलते. ती केवळ सेवेसाठी भ्रमणभाष करत नाही, तर अनौपचारिक बोलून साधकांशी जवळीक साधते.

४ आ. साधकांना कृतीशील करणे

४ आ १. युवा साधकांचा आढावा घेण्यास शिकवणे :  तिने मला युवा साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा दिली. ‘मला कोणत्या साधकांचा आढावा घ्यायला दिला, तर त्याचा लाभ होईल’, याचा अभ्यास करून तिने मला त्या साधकांशी जोडून दिले. मला युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायला सांगितल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘मी तर मोठी आहे. मी मुलांचा आढावा कसा घेणार ?’ त्यावर ताईने सांगितले, ‘‘काकू, असा विचार करायचा नाही. तुम्ही प्रयत्न करा.’’ तिने मला अन्य साधिका घेत असलेल्या मुलांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात उपस्थित रहायला सांगून ‘आढावा कसा घ्यायचा ?’, हे शिकवले.

४ आ २. आधी माझ्या मनात विचार यायचे, ‘मी नुसती घरात बसली आहे. मी काहीच करत नाही.’ ताईमुळे मला घरात बसून सेवा करता येऊ लागली. ‘साधकाला कृतीशील कसे करायचे ?’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.

५. श्री. संगम बोरकर

५ अ. तत्त्वनिष्ठतेने मार्गदर्शन करणे : अनुराधाताई प्रतिदिन आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेते. ती सूत्रे सांगत असतांना ‘गुरुदेवच आम्हाला मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवते आणि तिने सांगितलेली सूत्रे कृतीत आणण्यासाठी प्रयत्न होतात.

५ आ. साधकांच्या प्रगतीची तळमळ : परात्पर गुरुदेव, सद्गुरु  आणि सर्व संत ‘प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी’, यासाठी प्रयत्न करत आहेत. काही वेळा उत्तरदायी साधकांना अडचण असल्यास ताई स्वतः साधकांना संपर्क करून त्यांना साधनेत पुढे जाण्यासाठी तळमळीने साहाय्य करते. ‘सर्व साधकांच्या प्रगतीसाठी गुरुदेवांनी केलेल्या संकल्पाचा लाभ प्रत्येक साधकाला व्हावा’, यासाठी तिची तळमळ असते.

५ इ. प्रेमभाव : मला काही वेळा वैयक्तिक अडचणी आल्यास सेवा करायला अडचणी येतात. तेव्हा मी ताईचे मार्गदर्शन घेतो. मी तिच्याशी बोलल्यावर माझ्या मनावरील ताण दूर होऊन मला प्रयत्न करायला उभारी येते.

‘श्री गुरुदेवच अनुराधाताईकडून मला शिकवत आहेत’, यासाठी ही सूत्रे मी श्री गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.

आनंद गुरुमाऊलीला देत राहूया ।

भगवान दत्तगरूंच्या जयंती दिवशी ।
तुझा जन्म झाला ।
त्यामुळे दत्तगुरूंचे लाभले तुला आशीर्वाद ॥ १ ॥

लहानपणापासून आहेस तू गुणी आणि समजूतदार ।
लहान असूनही मला वाटे तुझा आधार ॥ २ ॥

आध्यात्मिक आई-वडील, यांच्या आशीर्वादाने ।
साधनेला आरंभ झाला ।
संत अन् सद्गुरु यांच्या कृपेने अन् संकल्पाने ।
तू चढू लागलीस प्रक्रियेची पायरी (टीप) ॥ ३ ॥

सेवा आणि साधना यांच्या प्रयत्नामुळे ।
तुझ्या तोंडवळ्यावर दिसू लागला निखळ आनंद ॥ ४ ॥

साक्षात् गुरुमाऊलीने केले त्याचे कौतुक ।
असाच आनंद गुरुमाऊलीला देत राहूया ॥ ५ ॥

टीप : स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया

– सौ. गायत्री शास्त्री (मोठी बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक