वळपे, पेडणे येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा आज जत्रोत्सव !

पेडणे तालुक्यातील वळपे येथे पौष शुक्ल पक्ष अष्टमी, कलियुग वर्ष ५१२२, म्हणजे २० जानेवारी २०२१ या दिवशी श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा जत्रोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने भक्तांच्या हाकेला धावून येणार्‍या या देवतांची माहिती पाहूया.

श्री देव रुद्रेश्वधर

इतिहास

फार वर्षांपूर्वी वेगवेगळ्या गावांतून आलेल्या ४ पूर्वजांनी येथील वळपे गावी वसाहत वसवली आणि ते येथे बंधूभावाने राहू लागले. हे चार बंधू म्हणजे आरोंदेकर, देऊलकर, ठाकुर अन् परब ही घराणी ! या निसर्गरम्य गावात पुष्कळ पाणी असल्यामुळे त्यांनी शेती व्यवसाय चालू केला. ते स्थानिक देवता श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर यांची भक्ती करू लागले. या देवता त्यांच्या हाकेला धावून आल्या. पूर्वीच्या काळी जवळपास डॉक्टर किंवा वैद्य नसत. कोणी आजारी पडला, तर या देवतांपैकी कुठलीही देवता व्यक्तीमध्ये संचार करून राखण देत असे, त्यानंतर ती व्यक्ती ठीक व्हायची. अशी या देवतांची अजूनही ख्याती आहे.

देवस्थान

पूर्वी कच्च्या बांधकामाचे देऊळ होते. नंतर पक्के बांधकाम करून २७ मे १९९६ या दिवशी येथे श्री रुद्रेश्‍वर देवतेचीही स्थापना करण्यात आली. शिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करण्यासाठी येथे भाविकांची गर्दी असते. देवळाच्या उजव्या बाजूला देवाची तळी आहे. त्यात बाराही मास लोकांना औषधयुक्त पाणी मिळते. या तळीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे अनेक लोकांचे त्वचेचे रोग बरे झाल्याचे ज्ञात आहे.

जत्रोत्सव

भक्तांच्या हाकेला पावणार्‍या देवतेसाठी कोणतातरी उत्सव साजरा केला पाहिजे, असे पूर्वजांमध्ये बोलणे झाले आणि त्याच दिवसांत त्या गावात दशावतारी नाट्यमंडळ आले होते. त्यांच्याशी बोलणी चालू करून जत्रोत्सवही चालू झाला. जत्रोत्सवाच्या दिवशी विविध धार्मिक विधी केले जातात. रात्री दशावतारी नाट्यमंडळाच्या वतीने नाट्यप्रयोग आरंभ होऊन सकाळी ६ वाजता जत्रोत्सवाची सांगता होते.

संकलक : देवस्थान समिती, वळपे, पेडणे, गोवा.