राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचे यशाचे दावे !

  • कोकण आणि विदर्भ येथे भाजपचे वर्चस्व

  • मनसेला ३ जागा

  • लातूर येथे दाबके ग्रामपंचायतीत ‘आप’चे ५ सदस्य

मुंबई – सर्वाधिक ग्रामपंचायतींत भाजपचा विजय झाल्याचा दावा भाजपने, तर ८० टक्के ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९ जानेवारी या दिवशी निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट होईल. प्रथम फडणवीस यांच्या काळात सरपंचांची थेट निवडणूक घेण्याचे ठरले, त्यामुळे भाजपला त्याचा लाभ झाला, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना काळात भाजपने तळागाळात काम केल्याने हे यश मिळाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ठाणे, बीड, बुलढाणा, नगर या जिल्ह्यांतील प्रत्येकी १ ग्रामपंचायत मनसेने कह्यात घेतली आहे.

विदर्भात भाजपला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता मिळवली आहे, तर २३ ग्रामपंचायती शिवसेनेच्या कह्यात गेल्या आहेत. धुळे तालुक्यात ६५ पैकी ५७ ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता मिळवली आहे. भंडारा तालुक्यातील १८ पैकी १४ जागांवर भाजप गटाने बाजी मारली आहे. नाशिकमधील पालखेड आणि माळशीरस येथे भाजप आघाडीवर आहे.

निवडणुकीतील अपप्रकार

गुलाल आणि फटाके यांना बंदी करूनही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. तिथे सातारा, सोलापूर जालना येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाई केली. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे मतमोजणीच्या वेळी विजयी उमेदवारांचे उत्साही कार्यकर्ते आवाक्याबाहेरचा जल्लोष करत असतांना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

निवडणुकांचे निकाल याप्रमाणे…

१. रायगड – रायगडमध्ये भाजप १७, तर शिवसेनेचा ११ आणि राष्ट्रवादीचा १९ ग्रामपंचायतींवर विजय झाला आहे. रोहा तालुक्यातील शेणवई ग्रामपंचायतीवर प्रथमच भगवा ध्वज फडकला आहे. निवडणुकीत शिवसेना ५, तर शेकाप ४ जागांवर विजयी झाला आहे. रोहा तालुक्यातील रोठखुर्द ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ पैकी ९ उमेदवार निवडून आले. कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक विकास आघाडी बहुमतात असून १३ पैकी १० स्थानिक विकास आघाडीकडे, तर ३ शिवसेनेकडे. कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायतीत ११ पैकी ६ जागांवर शेकाप-शिवसेना युती असलेल्या परिवर्तन विकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. पालखेडमध्ये भाजपप्रणित पॅनलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले आहेत.

२. ठाणे – ठाण्यात भाजप ६५, तर शिवसेनेला ३९ ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.

३. जळगाव – खुर्द ग्रामपंचायतीत २५ वर्षांपासून सत्ता सांभाळणारे शिवसेना समर्थक शरद कासट यांच्या विकास पॅनलला धक्का बसला आहे. त्यांना १७ पैकी अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. कासट हे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. शिवसेनेचे समर्थक असलेले दिलीप पाटील यांच्या परिवर्तन पॅनेलचा १४ जागांवर विजय झाला आहे. याठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या ११ जागापैकी ५ जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आले असून उर्वरित ६ जागांवर राष्ट्रवादी आणि भाजप समर्थक असलेले उमेदवार निवडून आले आहेत. जामनेर तालुक्यात भाजपचे नेते गिरीश महाजन यांची सरशी झाली. तालुक्यातील ६८ जागांतील ४५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सत्ता आहे. तालुक्यातील लोंढ्री, हिवरखेडा, नाचणखेडा देवपिंप्री, फत्तेपूर, पहुर, तोंडापूर, पाळधी या ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय झाला आहे.

४. सांगली – कडेगाव तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची सासुरवाडी असलेल्या म्हैशाळ ग्रामपंचायत येथे मनोज शिंदे-म्हैशाळकर यांच्या गटाचा पराभव झाला असून १७ पैकी १५ जागांवर भाजप विजयी झाले आहेत. कवठेपिरान ग्रामपंचायतीवर शिवसेना नेते भीमराव पाटील गटाची सत्ता कायम असून १७ पैकी १४ जागांवर विजय मिळवला आहे. तासगाव तालुक्यात सावळज ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसने १४, तर ३ जागांवर भाजपने विजय मिळावला आहे. हातनोली ग्रामपंचायतीमध्ये भाजप खासदार श्री. संजयकाका पाटील यांची सत्ता कायम आहे. खानापूर तालुक्यात शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी १३ पैकी ९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे मंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी ९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम ठेवले आहे.

५. सोलापूर – माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे या ग्रामपंचायतीमध्ये एकत्रित आलेल्या चार प्रस्थापितांना युवकांच्या आघाडीने धक्का देत विजय मिळवला आहे. वैराग भागात तिरंगी लढतीत शेळगाव आणि धामणगाव या दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. मंगळवेढा तालुक्यातील २२ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिवंगत आमदार भारत भालके गटाने २२ मधील १२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली अकलूज ग्रामपंचायत पुन्हा भाजपने कह्यात घेतली आहे. भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील गटाने १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळवला, तर १ जागा बिनविरोध झाली आहे.

६. गोंदिया – तिरोडा तालुक्यातील पालडोगरी ग्रामपंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. या ग्रामपंचायतीत १० पैकी १ भाजपला, तर ९ जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत ग्रामविकास पॅनल विजयी झाले आहे. सडकअर्जुनी तालुक्यातील रेगेपार पांढरी ग्रामपंचायतीत ९ पैकी ९ जागेवर ग्रामविकास पॅनल निवडून आलेले आहे. हे पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या कोदामेडी गावात ९ पैकी ५ जागा भाजपला, तर ४ जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत.

७. अमरावती – महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. १३ पैकी ८ जागांवर यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. राज्य पणन महासंघाच्या संचालिका छाया दंडाळे यांचा सुरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप राऊत आणि अतुल गवड यांच्या गटाच्या ग्रामविकास पॅनेलने ७ पैकी ७ जागा जिंकल्या.

८. नंदुरबार – तालुक्यातील भालेर ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट झाला आहे. ११ पैकी ६ जागांवर भाजपा विजयी झाला असून शिवसेनेला ५ जागा मिळाल्या आहेत. तालुक्यातील भाडवड ग्रामपंचायत निवडणुकीत योगेश राजपूत आणि संजय राजपूत अशा २ उमेदवारांना सारखी २२२ मते मिळाली. ईश्‍वर चिठ्ठी टाकून केलेल्या पहाणीत योगेश राजपूत विजयी झाले. नवापूर तालुक्यातील वडकळंबी प्रभाग क्रमांक दोनमध्ये रविता गावित आणि विनू गावित या दोघी उमेदवारांना ११८ एकसारखी मते मिळाली. या वेळी ईश्‍वर चिठ्ठी टाकून केलेल्या पहाणीत विनू रविश गावित विजयी झाल्या.

९. बुलढाणा – जिल्ह्यातील साखरखेरडा ग्रामपंचायतीमध्ये १७ पैकी ११ जागा जिंकून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे गटाचा विजय झाला.

१०. नगर – भाजप नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा पराभव झाला. राष्ट्र्रवादी काँग्रेसने ९ पैकी ७ जागा जिंकून सत्ता परिवर्तन केले आहे.

११. शेगाव – शेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपला १२, तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आहे.

१२. नाशिक – तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या २०७ जागापैकी १०३ जागांवर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे.

१३. बीड – जिल्ह्यातील परळी तालुक्यातील ८ मधील ६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे.

लक्षवेधी ग्रामपंचायतींचे निकाल

संभाजीनगर येथील पाटोदा या गावांकडे अनेक जणांचे लक्ष होते. आतापर्यंत पुरस्कार मिळवणारे देखणे आणि स्वयंपूर्ण गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटोदा येथे गेले २५ वर्षे असलेले भास्कर पेरे पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यांची कन्या अनुराधा येथे उभी होती आणि तिचा पराभव झाला. पाटोदा ग्रामपंचायतीत ११ सदस्य असून ८ जागा पेरे पाटील यांच्या विरोधी पॅनेलने आधीच बिनविरोध मिळवल्या होत्या. ३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भास्करराव पेरे पाटील पॅनेलचे ३ उमेदवार पराभूत झाले आहेत. पाटोदा ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ११ जागा कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनेलच्या कह्यात गेल्या आहेत. संभाजीनगर येथील ६५ ठिकाणी एम्आयएम्चे वर्चस्व असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.

  • सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखालील ‘पॅनल’ने भाजपचा झेंडा फडकावला आहे. ११ मधील ६ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
  • नगर येथील आदर्श गाव हिरवे बाजार येथे पोपटराव पवार विजयी झाले आहेत. राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
  • लोणीखुर्द येथे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांना हार पत्करावी लागली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या गावी शिवसेना विजयी !

कोल्हापूर, १८ जानेवारी – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातही शिवसेना आघाडीवर आहे. विशेष म्हणजे येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत होते आणि शिवसेना एकटी वेगळी होती. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी या सर्वांवर मात करत ६ जागांवर विजय मिळवला आहे. ३ जागा भाजप आघाडीला मिळाल्या आहेत. या संदर्भात आबीटकर म्हणाले, ‘‘विकासाच्या जोरावरच विजय मिळवला आहे.’’

. शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. नामदेव गिरी यांच्या नेतृत्वाखाली शित्तूर तर्फ मलकापूर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले असून ९ पैकी ९ जागा जिंकून शिवसेनेने वर्चस्व राखले असून येथे काँग्रेस हारली आहे.

२. नृसिंहवाडी येथे श्री दत्त देवस्थानचे सचिव श्री. अमोल विभूते-पुजारी हे विजयी झाले आहेत.

३. पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचा अनेक ग्रामपंचायतीवर झेंडा

४. करवीर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांत्तर झाले आहे, १२ पंचायतीमध्ये सत्तारूढ गटाने सत्ता राखली आहे, तर २७ गावांमध्ये स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहिले आहे.


मतदानासाठी पैसे वाटप केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद

वैराग (जिल्हा सोलापूर) – सासुरे (तालुका बार्शी) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदाराला पैसे वाटप करतांनाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला होता. ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रशांत भारती आणि चंद्रकला भारती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १५ जानेवारीला पैसे वाटप करण्यात आले होते. (पैसे वाटून उमेदवार निवडून येत असेल, तर अशी लोकशाही निरर्थक नव्हे का ? – संपादक)