भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये असणार्या हिंदी महासागरातील रामसेतू हा हिंदूंच्या धार्मिक जिव्हाळ्याचा विषय आहे. रामसेतूशी रामभक्तांची श्रद्धा जोडली गेली आहे. भारतीय पुराणशास्त्रानुसार सीतामातेच्या शोधार्थ रामेश्वरम् ते श्रीलंका असे जाणार्या श्रीरामाने वानरांच्या साहाय्याने दिव्य असा हा सेतू उभारला होता आणि रावणावर स्वारी केली होती, अशी त्याची महती आहे. अशा आशयाचे अनेक संदर्भ मिळाले, तरी तथाकथित धर्मवाद्यांना ‘हा रामसेतू खरा आहे कि खोटा ?’, असा प्रश्न पडतोच. आजचे युग हे विज्ञानयुग असल्याने प्रत्येक प्रश्न हा विज्ञानाच्या तराजूतच तोलला जातो. त्यामुळे आता या रामसेतूचे अस्तित्वही संशोधनाच्या तराजूत तोलले जाणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने रामसेतूच्या संदर्भातील संशोधनाला प्रथमच संमती दिली आहे. ‘श्रीराम झालाच नाही’ किंवा ‘रामाने रामसेतू बांधलाच नाही’, असे म्हणणार्यांसाठी संशोधनाला मिळालेली संमती म्हणजे चपराकच म्हणावी लागेल. असे असले, तरी संशोधनाला प्रारंभ झाल्यावर तथाकथित पुरोगामी किंवा हिंदुद्वेष्टे यांना पोटशूळ उठून ते पुन्हा रामसेतूच्या अस्तित्वाविषयी टीका करतीलच. संशोधनाच्या अंतर्गत समुद्राच्या पाण्याखाली विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे. त्या माध्यमातून रामसेतूची प्राचीनता पडताळण्यात येईल. सद्य:स्थितीत रामसेतूची लांबी ४८ किलोमीटर इतकी आहे. रामसेतू कधी बनवण्यात आला ? त्याच्या दगडांची शृंखला कशी आहे ? रामसेतूच्या काळात तेथे वस्ती होती का ? अशा सर्वंकष दृष्टीने सागराच्या तळाशी जाऊन अभ्यास करण्यात येणार आहे.
हिंदुद्वेष्टा पुरातत्व विभाग !
रामसेतू हा मानवनिर्मित होता कि निसर्गनिर्मित होता, याच्या शोधासाठी विविध संस्थांकडून या आधीही अनेकदा मागणी करण्यात आली होती. वर्ष २००७ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने रामसेतूच्या संदर्भात कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नसल्याचे म्हटले होते; पण नासाच्या संशोधकांनी ‘रामसेतू हा प्राचीन असून निसर्गनिर्मित नाही’, हे मान्य केले आहे. वर्ष २०१७ मध्ये अमेरिकेतील ‘सायन्स चॅनल’ वाहिनीच्या वृत्तातही शास्त्रज्ञांनी भारत आणि श्रीलंका यांत असणारा रामसेतू हा ७ सहस्र वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले आहे. या सर्व घटनांनी रामसेतूच्या वास्तवतेवर विश्वास ठेवण्यास सर्वांना भाग पाडले आहे. जे सत्य विदेशींना समजते, ते भारतियांना इतक्या वर्षांत समजले नाही, हे दुर्दैवच आहे. रामसेतू भारताशी निगडित असतांनाही त्याचे संशोधन करण्यात भारतीय पुरातत्व विभागाने इतकी वर्षे अक्षम्य दुर्लक्ष केले. यातूनच पुरातत्व विभागाला हिंदूंच्या धार्मिक भावनांचे किती मोल आहे, हे दिसून येते. पुरातत्व विभागाने हिंदूंची क्षमा मागायला हवी. याही आधी अनेक घटनांमधून पुरातत्व विभागाचा हिंदुद्वेष्टा कारभार दिसून आला होता. मथुरा (उत्तरप्रदेश) येथे नाल्यासाठीच्या खोदकामाच्या वेळी २ सहस्र वर्षांपूर्वीची अग्निदेवतेची मूर्ती सापडली होती; मात्र पुरातत्व विभागाने मूर्तीचे संशोधन न करता तिला कह्यात घेण्यासही नकार दिला. पुणे येथील लोहगड किल्ल्यावर उरूस-ए-शरीफ साजरा करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना हिंदुत्वनिष्ठांनी पुरातत्व विभागाला पत्राद्वारे दिली होती; मात्र विभागाने उरूसाच्या आयोजकांना पत्र पाठवून केवळ जाणीव करून दिली. प्रत्यक्षात उरूस साजरा होत असतांना पुरातत्व विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. रामजन्मभूमीवर मंदिर असल्याचे पुरावे वर्ष १९७६-७७ मध्येच सापडले होते; मात्र पुरातत्व विभागातील साम्यवादी विचारांच्या एका प्रमुखाने ते दडपले. पुरावे वेळीच दिले असते, तर इतका मोठा ऐतिहासिक संघर्ष करावाच लागला नसता. या सर्व घटनांमधून पुरातत्व विभागाचा हिंदुद्वेषी तोंडवळाच प्रत्येक वेळी समोर येतो. हे वारंवार होत असेल, तर पुरातत्व विभागच विसर्जित करायला हवा. मंदिरे किंवा पुरातन वास्तू यांचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी हिंदूंनीच आता पुरातत्व विभागाला पुढाकार घ्यायला भाग पाडायला हवे. कालौघात हिंदूंच्या अशा अनेक गोष्टी लुप्त झाल्या आहेत; पण त्या टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विज्ञानवादी आणि पुराणातील सत्य
‘समुद्रावर दगडांचा सेतू बांधणे अशक्य आहे’, अशी टीका अनेकांनी केली; पण असे म्हणणार्यांच्या विधानाला आधार तरी कुठला होता ? हिंदु धर्माची एखादी गोष्ट समोर आली की, टीका करायची आणि ती गोष्ट कशी खोटी अन् चुकीची आहे, हेच सांगायचे, अशी हिंदुद्वेषी मानसिकता बाळगणार्यांच्या विधानांवर कोण विश्वास ठेवेल ? ‘वाल्मीकि रामायणा’मध्ये श्रीरामाने समुद्रावर हा सेतू कसा उभारला ?, याचे यथोचित वर्णन दिले आहे. वाल्मीकि हे ऋषि होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणाची सत्यता पडताळण्याची आवश्यकताच नाही. टीकाकारांनीही वाल्मीकि रामायण वाचण्याचे तरी कष्ट घ्यायला हवेत. श्रीरामावर अपार श्रद्धा ठेवून दिव्य असा रामसेतू बांधणारे तेव्हाचे वानरही ज्ञानी होते; पण आजच्या काळातील विज्ञानवाद्यांना सत्य न समजणे खेदजनक आहे. रामसेतू उभारल्याचा आणि रामायण घडल्याचा कालावधीही काही संशोधनकर्त्यांच्या दृष्टीने समानच आहे. रामसेतूसाठी वापरलेले दगड पाण्यावर तरंगतात. यामागील कारण जगभरातील मोठमोठ्या शास्त्रज्ञांना संशोधन करूनही सापडलेले नाही किंवा त्याविषयी समाधानकारक निष्कर्षही काढला गेलेला नाही. त्यामुळे पुराणातील गोष्टींना कुणीही हिणवू नये किंवा ‘त्या आख्यायिका होत्या’, असेही संबोधू नये. त्या प्राचीन अगाध ज्ञानाचा भावी पिढीला उपयोग करून देणेच श्रेयस्कर आहे.
आता लवकरच रामसेतूच्या संशोधनाला प्रारंभ होईल. रामसेतूचे रामायणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. रामसेतूच्या संशोधनाच्या माध्यमातून रामायण पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. श्रीराममंदिर उभारणीच्या संघर्षाला न्याय मिळण्यासाठी अनेक दशके लागली. त्याची पुनरावृत्ती रामसेतूच्या संदर्भात घडू नये, ही रामभक्तांची अपेक्षा आहे. पुरातत्व विभागाने रामसेतूमागील सत्य आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व लवकरात लवकर सर्वांसमोर आणावे. तसे झाल्यासच श्रीराममंदिराप्रमाणे रामसेतूलाही खर्या अर्थाने न्याय मिळाला, असे होईल !