नियम-अटी यांचे पालन करून शिवजयंती साजरी करू !

शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर – शिवाजी पेठेतील शिखर संस्था असणार्‍या शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी या दिवशी होणारी शिवजयंती प्रशासनाच्या नियम, अटी यांचे पालन करून साजरी केली जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री. सुजित चव्हाण यांनी सांगितले. सामाजिक उपक्रमासमवेत कोरोना योद्धयांचा सत्कार, गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि विधायक कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर सभागृहात शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या संदर्भात बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.

माजी नगरसेवक अजित राऊत म्हणाले, वर्गणीतून जमा होणारे पैसे मुदत ठेवमध्ये ठेवून त्या माध्यमातून सामजिक उपक्रम राबवू. माजी अध्यक्ष रोहित मोरे यांनी एखादा गडकिल्ला घेऊन स्वच्छता करू, विधायक कार्य हाती घेऊ, अशी सूचना केली. या वेळी युवासेनेचे मंजित माने, अशोकराव साळोखे, शाहीर दिलीप सावंत, मोहन साळोखे यांनी त्यांची मनोगत व्यक्त केले.

शिवजयंती उत्साहातच झाली पाहिजे ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

देशभरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पदयात्रा, फेर्‍या काढल्या जात आहेत. कोल्हापुरातही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीला निर्बंध का ? जरी निर्बंध घातले, तरी शिवाजी पेठेची शिवजयंती नेहमीप्रमाणे उत्साहातच झाली पाहिजे, अशी सूचना शिवसेना शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले यांनी केली.