मडगाव, ११ जानेवारी (पत्रक) – १२ जानेवरीला युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती यांनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभाविपच्या मडगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी यंदा दामोदर साल कोंब येथे हा कार्यक्रम साजरा केला. स्वामी विवेकानंद विश्व धार्मिक संमेलन-शिकागो (१८९३) येथे जाण्यापूर्वी गोव्यात ख्रिस्ती धर्म आणि संस्कृती यांवर सखोल अभ्यास करण्यासाठी आले होते. तेव्हा कोंब, मडगाव येथील दामोदर सालाच्या बाजूला असलेली खोली त्यांना रहाण्यासाठी देण्यात आली होती. या जागेचे एक विशेष ऐतिहासिक मूल्य आहे आणि ही खोली अजूनही तशीच जपून ठेवण्यात आली आहे. अभाविप मडगाव कार्यकर्त्यांनी या जागेला भेट देऊन या जागेविषयीची माहिती जाणून घेतली. या वेळी मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग (भाई) अनंत नाईक यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच निवृत्त मुख्याध्यापक आणि मठग्रामस्थ हिंदू सभेचे शैक्षणिक सल्लागार श्री. अनिल पै यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वामीजींच्या जीवनाविषयी अवगत केले. या कार्यक्रमास दक्षिण गोवा जिल्हा संयोजक संकल्प फळदेसाई, सहसंयोजक खेमल प्रभु शिरोडकर, मडगाव शहर मंत्री सुमिता देसाई, सहमंत्री यश कंटक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.