रायगड – पेण शहरातील आदिवासी पाड्यात रहाणार्या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी मनसेने केली आहे. या संदर्भात आपण अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्यासह चर्चा केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. नांदगावकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. पीडित कुटुंबियांना मनसेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीनुसार त्वरित ८ लाख २५ सहस्र रुपयांचे साहाय्य द्यावे, असे निर्देश दिले. बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडितेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते, त्याची रक्कम राज्य शासनाच्या वतीने अनेक प्रकरणात दिली जात नसून त्याविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवणार असल्याचे देखील रामदास आठवले यांनी सांगितले. मुलीच्या वडिलांना शासकीय नोकरी देऊन या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर द्यावे, अशी सूचना रामदास आठवले यांनी प्रशासनाला केली.