चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव

पूर्वी चराठा गावची १३ वी वाडी म्हणून ओळख असलेली सुंदरवाडी म्हणजेच आजचे सावंतवाडी शहर. पूर्वी चराठा हे गाव ‘मौजे चराठिये’ या नावाने ओळखले जायचे. गावच्या श्री सातेरीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्बादशी, कलियुग वर्ष ५१२२ (१० जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.

संकलक : श्री. सीताराम म्हापणकर, माजगाव, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.

श्री सातेरीदेवी

देवस्थानचे स्वरूप

वर्ष १६९२ मध्ये सावंत-भोसले घराण्याचे दुसरे खेम सावंत यांनी सुंदरवाडी (आताचे सावंतवाडी शहर) आपल्या राजधानीचे ठिकाण बनवले. चराठा गावची रवळनाथ पावणाई ही मुख्य देवता असून बारापाचाप्रमाणे श्री सातेरीदेवी ही ग्रामदेवता आहे. श्री सातेरीदेवीच्या मंदिराभोवती वेताळ, गारुडी, पंचाग्री, लिंगेश्‍वर, म्हारिंगण आणि दांडेकर यांची छोटी देवळे आहेत. पूर्वी ही सर्व देवालये येथून २ कि.मी. अंतरावर जुना गावठण (पूर्वस्थान) या ठिकाणी होती.

कौल घेण्याची पद्धत

या देवस्थानचे काम कुळाचा अंधार, पूर्वेचा वस, गाव मूळपुरुष, पूर्वेचा महार, पावणाईचा पूर्वस, भूतनाथ या संचारांच्या विचारांनुसार पाहिले जाते. या देवस्थानची रवळनाथ, पावणाई, भूतनाथ, अशी ३ तरंगे आहेत. या देवस्थानचा कौल घेण्यासाठी ४७ तांदुळ घेतात. त्याद्वारे संकटकाळात वा शुभकार्यासाठी देवाला मार्ग विचारला जातो.

श्री सातेरीदेवीचे मंदिर

देवस्थानचे मानकरी

या देवस्थानचे परब, मर्ते, गुरव, बिर्जे, मेस्त्री, असे ५ मानकरी असून बहुमानी म्हणून ‘कोठावळे’ आणि भूमीचालक म्हणून ‘दांडेकर’ आहेत. श्री. राजाराम परब हे या देवस्थानचे प्रमुख मानकरी असून मंदिराचे पुजारी असलेले श्री. मामा गुरव हे जाणकार आहेत. गावात परब समाजाच्या कुलदेवतेचे छोटेखानी मंदिर आहे.

ग्रामदेवता : गावाचे संरक्षण करणे हे ग्रामदेवतेचे मुख्य कार्य होय. निरनिराळ्या साथीच्या रोगांपासून गावकर्‍यांचा बचाव आणि मुक्तता, तसेच गुराढोरांचे रोग किंवा शेतीवर येणारे रोग यांपासून ग्रामदेवता रक्षण करते. – (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परमेश्‍वर, ईश्‍वर, अवतार आणि देव’)

जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

यावर्षी जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून जत्रोत्सवात सहभागी व्हावे अन् देवतांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.