ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

कालच्या लेखात आपण ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील साम्य, ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाचे महत्त्व, शनि ग्रहाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या महत्त्व आणि शनि ग्रहाशी संबंधित करावयाची साधना याविषयी माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/439231.html

सौ. प्राजक्ता जोशी

४. शनि ग्रहाशी संबंधित करावयाची साधना

४ उ. शनीच्या लोखंडाच्या प्रतिमेचे पूजन आणि दान यांचा संकल्प : ‘मम जन्मराशे: सकाशात् अनिष्टस्थानस्थितशने: पीडापरिहारार्थम् एकादशस्थानवत् शुभफलप्राप्त्यर्थं लोहप्रतिमायां शनैश्‍चरपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) (टीप) दानं च करिष्ये ।

अर्थ : ‘मी माझ्या जन्मपत्रिकेत अनिष्ट स्थानी असलेल्या शनीची पीडा दूर व्हावी आणि तो अकराव्या स्थानात असल्याप्रमाणे शुभ फल देणारा व्हावा’, यासाठी लोखंडाच्या शनिमूर्तीची पूजा अन् ‘शनिदेव प्रसन्न व्हावा’, यासाठी ‘अमुक’ वस्तूचे दान करतो.

टीप – ‘अमुक’ या शब्दाच्या ठिकाणी ज्या वस्तूचे दान करायचे असेल, त्या वस्तूचे नाव घ्यावे.

ध्यान

अहो सौराष्ट्रसञ्जात छायापुत्र चतुर्भुज ।
कृष्णवर्णार्कगोत्रीय बाणहस्त धनुर्धर ॥

त्रिशूलिश्‍च समागच्छ वरदो गृध्रवाहन ।
प्रजापते तु संपूज्य: सरोजे पश्‍चिमे दले ॥

अर्थ : शनिदेवाने सौराष्ट्र देशी अवतार घेतला. तो सूर्य आणि छायादेवी यांचा पुत्र होय. त्याला चार हात आहेत. तो रंगाने काळा आहे. त्याच्या एका हातात धनुष्य, एका हातात बाण आणि एका हातात त्रिशूळ आहे. चौथा हात वर देणारा आहे. ‘गिधाड’ हे त्याचे वाहन आहे. तो सर्व प्रजेचा पालनकर्ता आहे. नवग्रहांच्या कमळामध्ये त्याची स्थापना मागच्या पाकळीच्या ठिकाणी केली जाते. अशा या शनिदेवाची आराधना करावी.

४ ऊ. दानाचा श्‍लोक

शनैश्‍चरप्रीतिकरं दानं पीडानिवारकम् ।
सर्वापत्तिविनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम् ॥

अर्थ : शनिदेवाला प्रिय असे दान दिल्यावर पिडांचे, तसेच सर्व आपत्तींचे निवारण होते. असे हे दान मी श्रेष्ठ अशा ब्राह्मणाला देत आहे.

४ ए. शनिस्तोत्र

कोणस्थ: पिङ्गलो बभ्रु: कृष्णो रौद्रोऽन्तको यमः ।
सौरिः शनैश्‍चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ॥

एतानि दश नामानि प्रातरुत्थाय य: पठेत् ।
शनैश्‍वरकृता पीडा न कदाचित् भविष्यति ॥

पिप्पलाद उवाच ।
नमस्ते कोणसंस्थाय पिङ्गलाय नमोऽस्तुते ।
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोऽस्तुते ॥ १ ॥

नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च ।
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ॥ २ ॥

नमस्ते मन्दसंज्ञाय शनैश्‍चर नमोऽस्तुते ।
प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ॥ ३ ॥

अर्थ : कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्‍चर आणि मंद या दहा नावांनी पिप्पलादऋषींनी शनिदेवाची स्तुती केली. ही दहा नावे सकाळी उठल्यावर जो म्हणील, त्याला कधीही शनिग्रहाची बाधा होणार नाही.

पिप्पलादऋषी म्हणतात, ‘‘हे कोनात रहाणार्‍या कोणस्था, हे पिंगला, हे बभ्रु, हे कृष्णा, हे रौद्रदेहा, हे अंतका, हे यमा, हे सौरी, हे विभो, हे मंदा, हे शनिदेवा, मी तुला नमस्कार करतो. मी दीन तुला शरण आलो आहे. तू माझ्यावर प्रसन्न हो.’’

हे स्तोत्र नित्य प्रातःकाळी पठण करावे.

५. साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय

अ. ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र प्रतिदिन म्हणावे.

आ. शनीच्या साडेसातीप्रीत्यर्थ जप, दान आणि पूजा अवश्य करावी.

इ. पीडापरिहारार्थ शनिवारी अभ्यंग स्नान करून नित्य शनिस्तोत्र पठण करावे.

ई. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडीद आणि मीठ शनीस अर्पण करावे. तेलाभिषेक करावा. काळी फुले वाहिल्याने पिडेचा परिहार (उपाय) होईल. ती न मिळाल्यास निळ्या रंगाची, उदा. गोकर्ण, कृष्णकमळ, अस्टर इत्यादी फुले वहावीत.

उ. शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे. निदान एकभुक्त असावे.

ऊ. नीलमण्याची अंगठी धारण करावी.’

(संदर्भ : दाते पंचांग)

६. वास्तुशास्त्रानुसार शनि ग्रहाचे महत्त्व

भारतीय वास्तुशास्त्राला १८ महर्षीची परंपरा आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, मत्स्यपुराण, अग्निपुराण, मानसारम्, समरांगण सूत्रधार, अपराजित पृच्छाः, मनुष्यालय चंद्रिका इत्यादी ग्रंथांत वास्तुशास्त्राचे विस्तृत विवेचन आहे. आपल्या वास्तूचा प्रभाव आपले शरीर आणि मन यांवर पडत असतो. भारतीय वास्तुशास्त्राने प्रकाश, हवा, बांधकामातील पक्केपणा, सौंदर्य, आरोग्य आणि भौतिक सुख-समृद्धीचा विचार केला आहे. प्रत्येक दिशेची तत्त्वे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम घडवतात. वास्तुशास्त्र हे दिशा आणि ऊर्जा यांचे शास्त्र आहे.

वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तू आणि कक्ष यांची दिशा ठरलेली आहे. वास्तुपुरुषमंडलामध्ये जी देवतांची स्थाने आहेत, त्या स्थानांशी त्या त्या देवतास्वरूप असलेल्या ऊर्जांचा विचार करावा लागतो. दश दिशांमधील पश्‍चिम दिशेचा स्वामी ‘शनि’ ग्रह आहे.

७. वास्तुशास्त्रानुसार शनि ग्रहाशी संबंधित पश्‍चिम दिशेला काय असावे ?

अ. वास्तुशास्त्रानुसार पश्‍चिम दिशा उंच असावी; कारण पश्‍चिम दिशेकडून ऋणभारित (निगेटिव्ह) अशुभ किरण येतात. पश्‍चिम दिशा उंच आणि पूर्व दिशेला उतार असेल, तर पूर्व दिशेकडून येणार्‍या शुभ किरणांचे प्रभुत्व वाढते अन् वास्तूमध्ये वर्षानुवर्षे टिकते.

आ. वास्तूचे बांधकाम करतांना पश्‍चिम आणि दक्षिण या दिशांची कंपाउंड भिंत प्रथम बांधून घेतल्यास वास्तूच्या बांधकामात विलंब होत नाही.

इ. कंपाउंड भिंत बांधतांना मेन गेट (प्रांगण प्रवेश) पश्‍चिम दिशेला असेल, तर पश्‍चिमेच्या चौथ्या ‘पुष्पदंत पदात आणि पाचव्या ‘वरुण’पदात (पद म्हणजे कप्पा किंवा भाग) असणे अत्यंत लाभदायक ठरते.

ई. पश्‍चिम दिशेला आवश्यक तेवढ्याच खिडक्या असाव्यात आणि त्या आकाराने लहान असाव्यात.

उ. ‘जेवणाचे पटल (भोजनगृह) पश्‍चिम दिशेला असणे उत्तम !’, असे मयमतम्कार सांगतात.

ऊ. पाण्याची वरची टाकी (ओव्हरहेड वॉटर टँक) पश्‍चिम दिशेला घ्यावी लागत असेल, तर पश्‍चिम दिशेला मधोमध ‘वरुण’ पदात घेतला, तर चालतो.

ए. घरातील फर्निचर आणि लॉफ्ट (माळा) पश्‍चिम किंवा दक्षिण भिंतीस असावेत.

ऐ. पश्‍चिम दिशेला अश्‍वत्थ (पिंपळ) वृक्ष असणे फलदायी आहे.

८. पश्‍चिम दिशेला शयनकक्ष असू नये !

पश्‍चिम दिशेचा स्वामी वायुतत्त्वाचा कारक शनि ग्रह असल्यामुळे ‘नैराश्य (डिप्रेशन) येणे, छोट्या छोट्या संकटांचा मनावर परिणाम होणे, सतत विचार पालटणे, स्थिरत्व न येणे’, या सगळ्याचा परिणाम पती-पत्नीच्या आपसांतील संबंधांवर होऊन वैवाहिक आयुष्यात अडचणी येऊ शकतात.

‘आपल्या वास्तूत नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक उपयोग व्हावा’, हा भारतीय वास्तुशास्त्राचा मुख्य हेतू आहे. दिशांचा विचार न केल्यास वास्तूत अनारोग्य येते आणि त्यातूनच भौतिक असमृद्धी, अपयश, नातेसंबंधांत दुरावा येतो. वास्तूसौख्य मिळण्यासाठी वास्तूमध्ये नियमित पूजा आणि धार्मिक विधी करावेत. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. प्रत्येकाने चांगले गुण अंगी आणण्याचा प्रयत्न करावा. ‘आपले घर हे एक मंदिर आहे किंवा आपल्या गुरूंचा आश्रम आहे’, या भावाने अहंविरहित राहिल्यास वास्तूत निश्‍चितच आनंद आणि शांती जाणवेल.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, फोंडा, गोवा. (२.१०.२०२०)