ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

‘आज आपण ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांनुसार शनि ग्रहाचा विचार करणार आहोत. चिंतन, खडतर अनुष्ठान, जप-तप, वैराग्य, संन्यास या गोष्टी शनि ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. वास्तुशास्त्रामध्ये दिशांना पुष्कळ महत्त्व आहे. पश्‍चिम दिशेचा स्वामी शनि ग्रह आहे. अंकशास्त्रानुसार ८ हा अंक शनि ग्रहाच्या अंमलाखाली येतो.

सौ. प्राजक्ता जोशी

१. ज्योतिष आणि वास्तु शास्त्रातील साम्य

​वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, आयुर्वेद, धार्मिक विधी, संगीतशास्त्र, मुहूर्तशास्त्र आदी सर्व भारतीय शास्त्रे एकमेकांशी जोडलेली आहेत. प्रत्येक शास्त्रात इतर शास्त्रांचा थोडाफार संबंध येतो. सर्व भारतीय तत्त्वज्ञान हे ‘श्रेयस (म्हणजे हितकारक) काय असेल ?’, याला महत्त्व देते. ‘तुम्हाला ते आवडेल कि नाही ?’, हा प्रश्‍न नाही. तुमच्या हिताचे, कल्याणाचे जे आहे, तेच अट्टाहासाने सांगते, उदा. आयुर्वेदाचे नियम किंवा अनेक धार्मिक गोष्टी. आजचे आधुनिक विज्ञान ‘प्रेयस (म्हणजे सुखकारक) काय आहे ?’, हे सांगते.

​ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या कुंडलीवरून ‘वास्तुसुख आहे का ? वास्तुयोग केव्हा आहे ? वास्तुसुखात कोणत्या अडचणी आहेत ?’, हे अभ्यासता येते. अनेक वेळा कुंडलीतील दिशा आणि वास्तूच्या दिशा यांमध्ये समानता दिसते. कुंडलीच्या माध्यमातून वास्तूचा अभ्यास करणे अधिक सयुक्तिक ठरते. ‘वास्तूच्या कोणत्या दिशेला दोष आहे ?’, हे कुंडलीवरून अभ्यासता येते.

२. ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाचे महत्त्व

​पौष अमावास्या, शुक्रवार, २४.१.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी शनि ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला. २४.१.२०२० या दिवसापासून कुंभ राशीला साडेसाती चालू झाली. धनु आणि मकर या राशींना साडेसाती आहे. या दिवशी वृश्‍चिक राशीची साडेसाती संपली.

२ अ. शनि ग्रह पालटानंतर लगेचच त्याची चांगली अथवा वाईट फळे मिळत नसून शेवटच्या सहा मासांत त्याचे अनुभव प्रकर्षाने जाणवत असणे : ‘२४.१.२०२० या दिवशी शनीने मकर राशीत प्रवेश केला आणि आता शनि ग्रह ‘उत्तराषाढा’ या रवीच्या नक्षत्रात आहे. रवि हा शनि ग्रहाचा शत्रूग्रह असल्याने हे भ्रमण त्रासदायक ठरू शकते. एका नक्षत्रातून शनीचे भ्रमण सरासरी १ वर्ष दहा मास असते. शनि ग्रहाला ‘मंद ग्रह’ म्हणतात; कारण शनि एका राशीत अडीच वर्षे असतो. यामुळे शनि ग्रह पालटानंतर लगेचच त्याची चांगली अथवा वाईट फळे मिळत नाहीत, तर शेवटच्या सहा मासांत त्याचे अनुभव प्रकर्षाने जाणवतात.

२ आ. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होणे : मकर ही शनीची स्वरास असल्याने मकर राशीत शनीचे आगमन शुभ असणार आहे. शनि हा ग्रह कर्माचा अधिपती असून तो अहंकार नाहीसा करतो. शनि हा संवेदनेचा कारक ग्रह आहे. शनि हा चिंतनशील ग्रह असल्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्नरत असणार्‍या साधकांना साधनेच्या प्रयत्नांत यश देतो. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होते.

३. शनि ग्रहाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या महत्त्व

३ अ. शनि ग्रह पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह असणे : हिंदु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर आणि कुंभ या शनि ग्रहाच्या राशी आहेत. शनि तूळ राशीत उच्चीचा होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा उच्च राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. हा ग्रह वायुतत्त्वाचा असून मनुष्याला आसक्तीकडून विरक्तीकडे नेतो. मानवी जीवनातील मान, अपमान, अवहेलना यांतून हा ग्रह परमार्थाकडे वळवतो. हा पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह आहे.

३ आ. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक असून अविचारांनी केलेल्या कर्मांची फळे साडेसातीत मिळतांना दिसणे : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या शुभ (गुण) आणि अशुभ (दोष) अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा केवळ शुभच असतो, असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्याही दोन बाजू आहेत; पण शनि ग्रहाची केवळ एकच बाजू विचारात घेतली जाते; म्हणूनच लोकांच्या मनात शनि ग्रहाविषयी भीती निर्माण होते. शनि ग्रह गर्व, अहंकार, पूर्वग्रह यांना दूर करून माणसाला माणुसकी शिकवतो आणि अंतरंगातील उच्च गुणांची ओळख करून देतो. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक आहे. जे शिस्तबद्ध, विनयशील आणि नम्र आहेत, त्यांना शनि उच्च पदाला घेऊन जातो, तर जे अहंकारी, गर्विष्ठ अन् स्वार्थी आहेत, त्यांना शनि त्रास देतो. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. या काळात व्यक्तीला स्वकीय-परकीय यांची जाणीव होते. स्वतःचे गुण-दोष लक्षात येतात, गर्वहरण होते आणि अहंकार गळून पडतो. माणुसकीची जाणीव होते. ‘एक माणूस म्हणून कसे जगावे ?’, याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कर्मांची फळे साडेसातीत मिळतांना दिसतात.

४. शनि ग्रहाशी संबंधित करावयाची साधना

४ अ. शनीची पीडापरिहारक दाने : सुवर्ण, लोखंड, नीलमणी, उडीद, म्हैस, तेल, काळे घोंगडे, काळी किंवा निळी फुले.

४ आ. जपसंख्या : तेवीस सहस्र

४ इ. पूजेसाठी शनीची लोखंडाची प्रतिमा वापरावी.

४ ई. शनीचा पौराण (पौराणिक) मंत्र

नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्‍चरम् ॥

– नवग्रहस्तोत्र, श्‍लोक ७

अर्थ : शनिदेव निळ्या अंजनाप्रमाणे भासतात. ते भगवान सूर्यनारायणाचे पुत्र असून साक्षात् यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आहेत. देवी छाया आणि भगवान सूर्य यांपासून उत्पन्न शनिदेवांना मी नमस्कार करतो.

(क्रमशः उद्याच्या अंकात)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, फोंडा, गोवा. (२.१०.२०२०)