सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये पत्रकारांचे मोठे योगदान ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार दिन साजरा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग –  वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील पत्रकार परिवर्तनाचे काम करत आहेत, तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे आयोजित पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलतांना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस फाटा येथील श्री इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्यासह पुरस्कारप्राप्त पत्रकार आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी  शिष्यवृत्ती प्राप्त झालेली पत्रकारांची मुले, तसेच इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेली पत्रकारांची मुले यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जेष्ठ पत्रकार  माधव कदम यांनी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या वेळी ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ महादेव परांजपे (आरोंदा), ‘कै. अरविंद शिरसाट स्मृती पुरस्कार’ तेजस देसाई, (दोडामार्ग), ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’ दीपेश परब (वेंगुर्ले), ‘उत्कृष्ट छायाचित्रकार’ अनिकेत उचले (कणकवली), ‘ग्रामीण पत्रकार’ दिनेश साटम (देवगड) या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम आणि पुषपगुच्छ देऊन गौरवण्यात आले.  ‘राज्यस्तरीय पुरस्कार’ मिळाल्याविषयी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा गौरव करण्यात आला. तरेळे येथील मंडळाने पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाची स्वच्छता केल्याविषयी त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी, तसेच मान्यवरांची त्यांचे विचार मांडले.

कोकण प्रेस क्लबच्या वतीने देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पत्रकारदिन साजरा करण्यात आला.