कुडाळ येथे दीड लाख रुपयांच्या गुटख्यासह ४ जण पोलिसांच्या कह्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

(प्रतिकात्मक चित्र)

कुडाळ – भाजीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीचे बिंग ४ जानेवारीला रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले. या वेळी पोलिसांनी चौघांना कह्यात घेतले आहे. या संशयितांकडून पोलिसांनी १ लाख ६८ सहस्र रुपये किमतीच्या गुटख्यासह २ चारचाकी वाहने कह्यात घेतली आहेत.

या कारवाईत पोलिसांनी संतोष मनोहर शिंदे आणि रूपेश विष्णु माने (दोघे रहाणार बेळगाव), रवींद्र गजानन ढवण (रहाणार पावशी), दत्ता उपाख्य सुशील गुरुनाथ पडते (रहाणार कुडाळ बाजारपेठ) या चौघांना कह्यात घेतले आहे. याविषयीची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मनसेचे कार्यकर्ते ‘व्हॉटस् अ‍ॅप’च्या माध्यमातून अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देणार ! – प्रसाद गावडे, कुडाळ तालुकाध्यक्ष, मनसे

गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देण्याची आवश्यकता का भासते ? गुन्हे घडू नयेत, यासाठी पोलिसांची कोणतीच यंत्रणा नाही का ?

कुडाळ – तालुक्यात चालू असलेल्या अवैध धंद्याची माहिती मनसेचे पदाधिकारी आता ‘व्हॉटस् अ‍ॅप’च्या माध्यमातून पोलिसांना देणार आहेत. त्यानंतर पोलिसांनी अशा अवैध धंद्याची पाळेमुळे खणून काढावीत, अशी चेतावणी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

तालुक्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांकडे यापूर्वीच पक्षाकडून पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले होते; मात्र त्या अवैध व्यवसाय करणार्‍यांशी काही पोलिसांचे हितसंबंध असल्यामुळे दुर्दैवाने कारवाई होत नाही. परिणामी अवैध व्यवसायांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांसह त्यांच्याशी हितसंबंध असणार्‍यांवर कारवाई करावी, असे गावडे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (अवैध धंद्यांविषयी सांगूनही कारवाई न करणार्‍या पोलिसांवर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)