दोन गटांतील वादाचा परिणाम
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने अशा प्रकारे गटागटातील वादांमुळे जत्रोत्सवांतील पावित्र्य भंग होते ! वास्तविक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मंदिरांतील उत्सव रहित करावे लागले आहेत, याचे भान ठेवून ज्यांना जत्रोत्सव साजरे करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी अधिक भक्तीभावाने त्यात सहभाग घेतला पाहिजे !
सावंतवाडी – तालुक्यातील कास येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री देवी माऊली मंदिर परिसरात सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडून १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान (एस्.आर्.पी.) असा फौजफाटा मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे.
येथील पंडित आणि भाईप या दोन गटांत जत्रोत्सव साजरा करण्यावरून वाद आहेत. कास येथील पंडित गटाने जत्रोत्सव साजरा करण्याविषयी बांदा पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यानुसार २७ डिसेंबरला उत्सव साजरा करण्याची सिद्धताही करण्यात आली होती, भाईप गटाने जत्रोत्सवावर बंदी आणण्यासाठी अर्ज दिला होता. जत्रोत्सवाविषयीच्या परस्परविरोधी अर्जांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जत्रोत्सवावर बंदी आणावी, असा अहवाल बांदा पोलिसांनी तहसीलदारांना दिल्यावर सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंदिर परिसरात जमावबंदी आदेश पारित केला आहे.