श्री दत्तजयंती निमित्त २९ आणि ३० डिसेंबरला देवगडकडे (जिल्हा नगर) जाणारे रस्ते बंद रहाणार !

श्रीदत्त मंदिर संस्थानचा निर्णय

नगर – जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी २९ आणि ३० डिसेंबर असे २ दिवस देवगडकडे जाणारे रस्ते बंद रहाणार आहेत. हा निर्णय श्री दत्त मंदिर देवगड संस्थानने घेतला आहे, अशी माहिती संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी २५ डिसेंबर या दिवशी दिली.

कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये कमालीची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर पाळण्यात येत असून सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर शासन, प्रशासनाकडून अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्या दृष्टीने कार्यकारी मंडळ आणि भक्त यांच्याशी चर्चा करून या वर्षी पार पडणारा भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार २९ डिसेंबर या दिवशी सकाळपासून ते ३० डिसेंबर या दिवशी सायंकाळपर्यंत प्रवरासंगम, देवगड फाटा आणि नेवासा येथून श्री क्षेत्र देवगडकडे येणारे रस्ते बंद केले जाणार आहेत, तसेच श्री क्षेत्र देवगड येथील नवीन स्वागतद्वारही पूर्णपणे बंद रहाणार आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.

दूरचित्रवाहिनी आणि फेसबूक यांद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

दत्त जन्मसोहळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी येणार्‍या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या आणि फेसबूक यांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेऊन प्रत्यक्ष श्री क्षेत्र देवगड येथे येण्याचे टाळावे आणि संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले. याविषयी भाविकांच्या होणार्‍या संभाव्य गैरसोयीविषयी संस्थान प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.