भाजी सुरीने चिरणे आणि विळीवर चिरणे यांतील भेद लक्षात आल्यावर साधकात झालेले पालट

‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या माध्यमातून ‘हिंदु धर्मशास्त्र किती श्रेष्ठ आहे ?’, हे मला परात्पर गुरुदेवांनी शिकवले. मी मुंबई येथील एका प्रसिद्ध पंचतारांकित ‘हॉटेल’मधल्या स्वयंपाकघरात कामाला होतो. पूर्णवेळ साधनारत झाल्यानंतर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करत असतांना मी रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवेला होतो. त्या वेळी सुरी आणि विळी यांवर भाजी चिरतांना त्यांचा स्वभावदोष अन् अहं यांवर होणार्‍या परिणामांविषयी झालेले चिंतन पुढे दिले आहे.

सुरीने भाजी चिरणे

१. सुरीने भाजी चिरतांना मनात अहंयुक्त विचार राहून शिकण्याची वृत्ती अल्प असणे

आश्रमात स्वयंपाकघरात भाजी चिरायला विळ्या वापरल्या जातात. मला विळीवर चिरता यायचे नाही, त्यामुळे मी कधीच विळी वापरत नसे. ‘मला पंचतारांकित ‘हॉटेल’मधला अनुभव आहे’, याचा मला अहं होता. ‘मला इतरांपेक्षा जलद गतीने भाज्या चिरता येतात’, असेही विचार माझ्या मनात सतत असायचे. मला सुरीने भाजी (कांदा) चिरायला पुष्कळ आवडायचे. मी भाजी जलद गतीने चिरायचो. मला विळीवर भाजी चिरता येत नाही; पण सुरीने एकदम जलद गतीने आणि छान चिरता येते. त्यामुळे मी ‘विळी कधीच वापरायची नाही, सुरीच वापरायची’, असा निश्‍चय केला होता. येथे माझी शिकण्याची वृत्ती अल्प होती.

श्री. अपूर्व ढगे

२. सुरीने भाजी चिरतांना कर्तेपणाचे विचार असणे आणि विळीवर चिरतांना शरणागती असल्यामुळे ‘आता भाजी चिरायला विळीच वापरावी’, असे वाटू लागणे

सुरीने भाजी चिरतांना माझ्या मनात कर्तेपणाचे पुष्कळ विचार यायचे. माझ्याकडून इतरांना न्यून लेखणे व्हायचे. सेवा करतांना माझ्या देहबोलीमध्ये (बॉडी लँग्वेजमध्ये) पालट व्हायचा. ‘माझा अहं वाढला आहे’, हे मला प्रकर्षाने जाणवायचे. एके दिवशी सेवा करतांना सुरी उपलब्ध नव्हती. एक विळी उपलब्ध होती. तेव्हा मी विचार केला, ‘आज आपण विळीवर चिरून बघूया.’ मी विळीवर भाजी चिरू लागलो. काही वेळानी देवाने मनात एक विचार दिला, ‘सुरीने भाजी चिरतांना कर्तेपणा असतो, तर विळीवर चिरतांना शरणागती असते.’ यानंतर त्यावर माझे चिंतन झाले. सुरीने चिरतांना ‘मी जलद गतीने चिरतो. मला सुरी चांगली हाताळता येते. माझे ‘हॉटेल मॅनेजमेंट’चे शिक्षण झाले आहे’, असे विचार माझ्या मनात असायचे; म्हणून सुरीने चिरतांना कर्तेपणा असायचा. मला विळीवर चिरायला जमायचे नाही. विळीवर चिरल्यामुळे माझी शिकण्याची स्थिती राहू लागली. मी देवाला सारखा शरण जात होतो आणि म्हणालो, ‘तूच मला विळीवर भाजी चिरायला शिकव.’ त्यामुळे एकाग्रताही होती; म्हणून ‘विळीवर भाजी चिरतांना शरणागती असते आणि आता भाजी चिरायला विळीच वापरावी’, असे मला वाटते.

विळीवर भाजी चिरणे

३. भाजी चिरण्यासाठी विळीचा वापर करतांना स्वतःत जाणवलेले पालट आणि त्यावरून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात येणे

त्यानंतर मी भाजी चिरायला पुष्कळ वेळा विळीचाच वापर करू लागलो. त्या वेळी मला पुष्कळ शांतता जाणवायची. ‘माझे देवाशी सतत अनुसंधान रहात आहे’, असे मला वाटायचे. माझ्याकडून सारखी प्रार्थना व्हायची. मला विळी वापरायची आवडही निर्माण झाली. आता सुरी वापरायचा विचार आला, तरी नकोसे वाटते. यावरून माझ्या लक्षात आले, ‘आपण कितीही पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अधीन झालो, तरी आपला हिंदु धर्म इतका श्रेष्ठ आहे की, तो आपल्याला परत परत त्याच्याकडे आणतोच.’

‘हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे किती सात्त्विक आहे ?’, हे वरील अनुभूतीवरून समजले. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या माध्यमातून ‘हिंदु धर्मशास्त्र किती श्रेष्ठ आहे ?’, हे परात्पर गुरुदेवांनी शिकवले, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– श्री. अपूर्व प्रसन्न ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक