कुंडई येथील जागृत श्री नवदुर्गादेवीचा जत्रोत्सव

फोंडा तालुक्यातील कुंडई गावातील श्री नवदुर्गा देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. २७ डिसेंबरला होणार्‍या देवस्थानच्या वार्षिक जत्रोेत्सवाच्या निमित्ताने देवस्थानचा अल्प परिचय येथे देत आहोत.

श्री नवदुर्गादेवी

श्री नवदुर्गा देवस्थान हेे कुंडई गावचे आराध्य ग्रामदैवत ! या देवस्थानच्या सर्व चालीरिती, देवकृत्ये, तसेच वार्षिक उत्सवाची देखभाल या गोष्टी गावकरी मोठ्या उत्साहाने करत असतात.

या देवालयाचा जीर्णोद्धार कुंडई ग्रामसंस्थेकडून १९१० या वर्षी झाला. कुंडईत श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून सर्वजण तिलाच ग्रामदैवत मानू लागले. त्यामुळे तेथील मूळ देवतांना तिची अनुषंगिक दैवते मानण्यात आले. श्री नवदुर्गादेवीच्या अनुषंगिक दैवतांमध्ये श्री महादेव (लिंग), श्री गणपति, श्री क्षेत्र गोकर्ण येथील श्री लंबोदर मूर्ती, श्री आदिनारायण, श्री ग्रामपुरुष, श्री वेताळ आणि श्री सिद्धेश्‍वर यांची मंदिरे आहेत.

कुंडई येथील श्री नवदुर्गादेवीचे मंदिर

या देवस्थानचा प्रतिवार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमीपासून चतुर्दशीपर्यंत होत असतो. चतुर्दशी हा वर्धापनदिन मानला जातो. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशीला रात्री नौकाविहार असतो. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशीच्या पहाटे देवीला पालखीतून श्री महादेव मंदिराकडील सजवलेल्या रथाकडे नेण्यात येते. तिथे पूजा आणि आरती झाल्यावर देवीच्या नावाचा गजर करत रथोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानंतर देवस्थानच्या प्राकारात स्त्रियांचा ‘दिवजां’ हा कार्यक्रम श्री घोडकादेव देवाच्या चरणी दिवज पेटवून साजरा केला जातो.

दीपस्तंभ

संध्याकाळी देवीचे कुलकर्णी देवीची आरती करून गार्‍हाणे घालतात. नंतर मंदिराभोवती रथ फिरून आल्यानंतर रथोत्सवाची समाप्ती होते.

संकलक : श्री. संजीव नाईक, मडकई

उत्सव कार्यक्रम

यंदा कोविड-१९ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर श्री नवदुर्गा संस्थान समितीने सूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, सर्व महाजन, कुळावी, भाविक, ग्रामस्थ, तसेच श्री नवदुर्गा संस्थानचे हितचिंतक यांना विनम्रपणे कळवण्यात येते आहे की, माता नवदुर्गेने कौलप्रसादाद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार यावर्षी २३ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत होणारा जत्रोत्सव औपचारिक स्वरूपात पार पाडला जाईल. त्यामुळे देवस्थानातील धार्मिक विधी व्यतिरिक्त कसल्याही प्रकारचे अन्य विधी, रथोत्सव, लालखी, दिवजां, जायवळ, तुळाभार, मनोरंजनाचे कार्यक्रम आदी रहित करावे लागत आहेत. जत्रेची फेरीही यंदा भरणार नाही. अचानक उद्भवलेल्या कोविड महामारीमुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही असा निर्णय क्रमप्राप्त आहे. याची नोंद घेऊन देवस्थान समितीला सहकार्य करावे आणि श्रींच्या कृपेस पात्र व्हावे, ही विनंती !