सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडेल (देवगड) गावची ग्रामदेवता श्री भावकादेवीचा ४४ वा वर्धापनदिन सोहळा आणि वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी (२६ डिसेंबर २०२०) या दिवशी कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त १ सहस्र वर्षांची परंपरा असलेल्या या देवस्थानचा इतिहास जाणून घेऊया.
संकलक : श्री. दीपक काशिराम वारीक, मु.पो. पडेल, देवगड, सिंधुदुर्ग
मंदिराची रचना
हे देवस्थान पूर्व-पश्चिम आहे. मंदिराच्या बाहेर उभे राहून आपण देवीचे मुखदर्शन सहजपणे घेऊ शकतो, अशी मंदिराची रचना आहे. हे या देवालयाच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून सतत ४ वर्षे जांभ्या दगडात कोरीव काम करून बांधले आहे. मंदिर ३ भागांत विभागले गेले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर ५०० ते ६०० भाविकांना बसण्यायोग्य प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपाच्या पुढे प्रदक्षिणा मंडप असून त्याच्या पुढे गर्भागार आहे. गर्भागारात उच्च स्थानावर विराजमान झालेल्या श्री भावकादेवीचे दर्शन घडते. मंदिराच्या प्रांगणात तुळशीवृंदावन आहे. देवीच्या आदेशाने मंदिराच्या समोर ठराविक सीमारेषा आखून वारीकवाडीची रचना झाली आहे. या सीमेच्या बाहेर घरबांधणी होत नाही.
प्राचीन आणि आधुनिक शैलीचा उत्तम नमुना असलेले मंदिर
श्री भावकादेवीची आताची मूर्ती १९७६ यावर्षी त्या ठिकाणी बसवण्यात आली आहे. त्यापूर्वी त्या ठिकाणी जुनी मूर्ती होती. अत्यंत जागृत असे हे देवस्थान असून त्याला एक सहस्र वर्षांचा इतिहास आहे. आता अस्तित्वात असलेल्या मंदिराचे बांधकाम २०१० या वर्षी प्रारंभ करून २०१४ या वर्षी पूर्ण झाले. मंदिराचे पूर्ण बांधकाम आर्.सी.सी. असून त्यावर जांभ्या दगडात नक्षीकाम केले आहे. सदर मंदिर प्राचीन आणि आधुनिक शैलीचा उत्तम नमुना म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
आध्यात्मिक त्रास दूर करणारी देवी
हे जागृत देवस्थान असून देवीच्या अंगार्याने, तीर्थप्राशनाने आध्यात्मिक त्रासांचे निवारण होते, तसेच श्री भावकादेवी नवसाला पावणारी देवता असून भक्तांच्या हाकेला धावून येते, अशी सर्व भाविकांची दृढ श्रद्धा आहे. देवीच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सुवासिनी देवीची खणानारळाने ओटी भरण्यासाठी आवर्जून येतात, तसेच संपूर्ण देशभरातून देवीचे भक्त दर्शनासाठी येत असतात.
देवस्थानचे व्यवस्थापन
देवीच्या नित्य पूजेचे दायित्व (जबाबदारी), तसेच देवस्थानचे संपूर्ण व्यवस्थापन वारीक मंडळींकडे असून देवीने स्वतः वारीक मंडळींकडे हे दायित्व दिले आहे.
मंदिराचा परिसर
मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून मंदिराच्या दक्षिण दिशेला श्री देव रवळनाथाचे मंदिर, तर देवालयाच्या मागच्या बाजूला वडकीदेवीचे मंदिर आहे. येथे दसर्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ सोने लुटण्यासाठी एकत्र येतात आणि ढोलताशाच्या गजरात सोने लुटतात. देवालयामुळे देवीच्या देवळात आणि देवालयाच्या परिसरातही देवतांचा सतत वास अनुभवता येतो.
देवस्थानमध्ये साजरे होणारे उत्सव
वर्षभर देवीच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव साजरे केले जातात. प्रतिवर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी संपूर्ण गावातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ असतो. शिमगोत्सव आणि होलिकोत्सवही मंदिरात साजरा केला जातो. होलिकोत्सवाच्या कालावधीत देवीची निशाणे सजवून ढोलताशांच्या गजरात घरोघर नेली जातात. नवरात्रोत्सवात साक्षात् देवीच्या ठिकाणी नवदुर्गामातेचे दर्शन होते. मंदिरात होणार्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी पूर्ण पावित्र्य जपले जाते.
जत्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
या वर्षी साजर्या होणार्या जत्रोत्सवानिमित्त सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पूजा आणि लघुरुद्राभिषेक, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ वाजल्यापासून तीर्थप्रसाद आणि स्थानिकांची भजने, रात्री १० ते ११ ढोलपथकाचा कार्यक्रम, रात्री ११ वाजता भजन, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा, देवीच्या दर्शनाचा, तीर्थप्रसाद अन् महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहनयावर्षी जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे आणि कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. |