पेडणे तालुक्यातील विर्नोडा गावातील श्री नारायणदेवाचा जत्रोत्सव वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा केला जातो. यंदाचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी म्हणजेच २६ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. त्या निमित्ताने देवस्थानची माहिती पाहूया.
श्री नारायणदेवाचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती वीरवर्णीय आहे. देवालयातील गाभार्यात ‘श्रीं’च्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला ‘श्रीं’चे पंचायतन आहे. विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘श्रीं’च्या देवालयात नारायणनागबळी यांसारखे विधी करण्याची व्यवस्था केली जाते. देवालयाच्या उजव्या बाजूला शिवपिंडी आहे. तेथेच श्री भगवतीदेवीचे देवालय आहे. श्री देव नितकारी याचे स्थान पटांगणात आहे. श्री भगवती देवालयासमोर मोठी तळी आहे.
संकलक : देवस्थान समिती, विर्नोडा, पेडणे, गोवा.
जत्रोत्सव
येथील जत्रोत्सवाचा आरंभ अभिषेकाने केला जातो. सकाळी ‘श्रीं’ना अभिषेक, त्यानंतर नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी महानैवेद्य आणि त्यानंतर महाप्रसाद (समाराधना) होईल. सायंकाळी महाजनांच्या वतीने ७ वाजता दिवजा कार्यक्रमात दीपस्तंभ प्रज्वलीत केला जाईल. रात्री १०.३० वाजता ‘श्रीं’च्या पादुकांच्या पालखीची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात श्री आदिस्थानदेवाच्या मांगरातून होऊन श्री देव नारायणाच्या प्राकारात तिचे आगमन होईल. त्यानंतर सर्व देवतांना विधीपूर्वक प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर श्री देव रवळनाथ मंडपात पालखी विधीपूर्वक आसनस्थ केली जाईल. रात्री १ वाजता मोचेमाडकर दशावतारी मंडळीच्या वतीने नाट्यप्रयोग आणि तद्नंतर जत्रोत्सवाची सांगता श्रीकृष्ण दहीहंडी फोडून केली जाईल. याला कालोत्सव म्हणतात. त्यानंतर पालखी श्री देव रवळनाथाच्या मंडपातून परत श्री आदिस्थानदेवाच्या मांगारात जाऊन उत्सवाची सांगता होईल.
ग्रामदेवतागावाची मुख्य देवता म्हणजे ग्रामदेवता. गावाचे संरक्षण करणे हे यांचे मुख्य कार्य होय. निरनिराळ्या साथीच्या रोगांपासून गावकर्यांचा बचाव आणि मुक्तता, तसेच गुराढोरांचे रोग किंवा शेतीवर येणारे रोग यांपासून ग्रामदेवता रक्षण करते. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परमेश्वर, ईश्वर, अवतार आणि देव’) |
‘ॐ नमो नारायणाय’ या अष्टाक्षरी मंत्राला ‘नारायणमंत्र’ असे नाव आहे. याला मंत्रराज असेही म्हणतात. नारायणमंत्राला श्रीविष्णूच्या आठ दृश्यरूपांचे म्हणजे पंचमहाभूते, सूर्य, चंद्र आणि यज्ञकर्ता यजमान यांचे आणि त्याचप्रमाणे ओंकाराच्या आठ मात्रांचेही प्रतीक समजतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्रीविष्णु’) |
धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !
अ. देवतांचे विडंबन करणारी उत्पादने वापरू नका !
आ. देवतांची चित्रे आणि शुभचिन्हे असलेले कपडे वापरू नका !
इ. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे अन् नावे असलेले फटाके वाजवू नका !
ई. चित्रे, जाहिराती, नाटके आदी माध्यमांतून होणारे देवता अन् संत यांचे विडंबन रोखा !
उ. देवळाच्या विश्वस्तपदी त्या देवतेच्या भक्ताचीच निवड करा !
ऊ. सार्वजनिक उत्सवांतील ध्वनीप्रदूषण आणि संस्कृतीहीन कार्यक्रम रोखा !
ए. जत्रोत्सवांतून जुगार आणि दारूची विक्री होऊ देऊ नका !
धर्मरक्षणाचे कार्य भगवंत करणारच आहे. जात, संप्रदाय, पक्ष, संघटना यांचा अहं बाजूला ठेवून तुम्ही ‘हिंदु’ या भावनेने संघटित होऊन आपापल्या परीने ते कार्य केल्यास भगवंताच्या कृपेस पात्र व्हाल !
देवाला फूल कशा प्रकारे वहावे ?
फुलाचा देठ देवाकडे आणि तुरा आपल्या दिशेने येईल, अशा प्रकारे फूल देवाला वहावे. फुलाच्या देठाकडून ग्रहण केल्या जाणार्या देवतांच्या लहरींमध्ये निर्गुण लहरींचे रूपांतर सगुण लहरींत केले जाते. या सगुण लहरी गंध आणि रंग कणांच्या माध्यमातून पूजकाकडे प्रक्षेपित केल्या जातात. मनुष्याचा स्थूलदेह हा पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या साहाय्याने बनलेला असल्याने रंग अन् गंध कणांच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्या लहरी त्याच्याकडून लगेच ग्रहण केल्या जातात. पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी निगडित अशा या लहरींचा पूजकाला त्रास न होता त्याच्याकडून या लहरींच्या माध्यमातून त्या त्या देवतेचे सगुण चैतन्य संपूर्णतः ग्रहण केले जाते.
(संदर्भ : सनातनच्या ‘धर्म असे का सांगतो ?’ या ग्रंथमालिकेतील ‘षोडशोपचार पूजनामागील अध्यात्मशास्त्र’)