भारतियांच्या उच्च वारशाचा, संस्कृतीचा दृष्टांत झालेले ख्रिस्ती गोमंतकीय तेलु दे माश्कारेन्यश !

गोव्यात पोर्तुगीज राजवट असतांना तेलु दे माश्कारेन्यश हे पोर्तुगाल येथील विद्यापिठात कायद्याचा अभ्यास करत होते. तेथे आणखीही गोमंतकीय विद्यार्थी होते. फावल्या वेळात त्या विद्यार्थ्यांनी तिथल्या वाचनालयात बसून हिंदुस्थानविषयक पुस्तके वाचण्यास प्रारंभ केला आणि त्यांना भारताच्या उच्च वारशाचा, संस्कृतीचा दृष्टांत झाला. युरोपीय संस्कृतीपेक्षा आपली भारतीय संस्कृती प्राचीन असल्याची जाणीव त्यांना झाली. ही संस्कृती सहिष्णु आहे. हिच्यात वैचारिक स्वातंत्र्य आहे, याचा त्यांना अभिमान वाटला आणि पारतंत्र्यात पडल्यामुळे ही संस्कृती तेजहीन होत असल्याविषयी त्यांना खंतही वाटली. त्या गोमंतकीय ख्रिस्ती विद्यार्थ्यांनी पोर्तुगालमध्ये ‘राष्ट्रीय हिंदु पक्ष’ स्थापन केला. २७ डिसेंबर १९२५ मध्ये त्याची स्थापना झाली. त्या दिवशी गोव्याच्या पद्धतीचे जेवण करून संघटकांनी सहभोजन केले. त्या वेळी सर्वश्री जाकारियश आंतांव, आंतोनियु नोरान्य, फुल्जेंसियु ब्रीतु, आयरिश ग्रासियश, फ्रांसिश्कु द कॉश्त, कुन्य गोमिश, ड्रस्टन रूद्रीगिश, फेर्नांदु दे कॉश्त यांची भाषणे झाली. हे सगळे विद्यार्थी होते. यांपैकी काहीनी भारतीय नावे स्वीकारली होती.

त्या पक्षावर गोव्यातील काही गुलामी वृत्तीची पोर्तुगीज वृत्तपत्रे तुटून पडली. ‘पंडित राम’ हे नाव धारण करणार्‍या एका ख्रिस्ती तरुणाने (म्हणजेच तेलु दे माश्कारेन्यश यांनी) लिस्बनहून या गुलामी वृत्तीच्या वृत्तपत्रांना जे उत्तर दिले, ते ‘भारत’ या पोर्तुगीज – मराठी साप्ताहिकाच्या ८ जुलै १९२६ च्या अंकात प्रसिद्ध झाले. तेलु माश्कारेन्यश यांना गोमंतकीय ख्रिस्ती समाजाला त्याच्या मूळ संस्कृतीपासून दूर नेण्यात येत असल्याची जाणीव झाली आणि त्या मन:स्थितीत त्यांनी गोव्यात गो.पुं. हेगडे देसाई यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध होणार्‍या ‘भारत’ या पोर्तुगीज-मराठी साप्ताहिकाकडे ‘खोट्या आदर्शांचा नाश’ या अर्थाच्या पोर्तुगीज भाषेतील शीर्षकाचा लेख लिहून पाठवला. ‘ख्रिस्ती समाजाच्या मनावर ठसवण्यात येणारी खोटी मूल्ये नष्ट करायला हवी’, असले विचार त्यांनी या लेखात मांडले.

माश्कारेन्यशनी असेही लिहिले, ‘आमची जी मराठी भाषा, ज्या भाषेने आमच्या हृदयाशी बोलले पाहिजे, जी भाषा आमच्या मायभूमीतून पवित्र पुष्पासारखी विकसित होते, त्या आमच्या भाषेला असह्यपणे तुच्छ लेखून आम्हाला पोर्तुगीज भाषा शिकवण्यात येते. अशा तर्‍हेने स्वदेश आणि स्वदेशाभिमान यांविषयी खोट्या कल्पना आम्हाला सांगून सावत्र आईसारख्या असलेल्या देशावर प्रेम करायला शिकवण्यात येते.’

लेखाचा शेवट त्यांनी खालील अर्थाच्या वाक्यात केला, ‘खरे वास्तव स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रथम मानसिक स्वातंत्र्य आम्ही मिळवू आणि ज्या दिवशी आमच्या सांस्कृतिक परंपरा, आमचे रितीरिवाज, आमची भाषा, आमच्या लोकांच्या हृदयात मूळ धरतील, त्या दिवशी पूजेसाठी आमच्यावर लादलेले खोटे आदर्श नष्ट होतील, खोटी प्रवचने देणारे तिरस्कृत होतील आणि भूतकाळातील भव्योदात्त रक्षेतून (राखेतून) सुंदर हिंदुस्थान पुनर्जन्म घेईल.’

– (संदर्भ : श्री. मनोहर हिरबा सरदेसाई लिखित गोवा, दमण आणि दिव स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास)