कोकण इतिहास परिषदेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुस्तकाचे प्रकाशन करताना उपस्थित मान्यवर

फोंडा (गोवा) – कोकण इतिहास परिषद, गोवा शाखेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन नागेशी, बांदोडा येथील राजे सौंधेकर घराण्याच्या वाड्यात नुकतेच करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला राजे सौंधेकर मधुलिंग नागेशकुमार वडियार, प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक सचिन मदगे, माजी खासदार आणि भाजप नेते अधिवक्ता नरेंद्र सावईकर, अभियंते दिलीप ढवळीकर, प्रशासकीय अधिकारी अरुण देसाई अन् रत्नाकर देसाई उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख वक्ते सचिन मदगे म्हणाले, ‘‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास मांडतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणजे मराठ्यांच्या आमदानीतील गोव्याचा पटही लेखक रत्नाकर देसाई यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर मांडला आहे. गोव्यातील १२ पैकी ८ तालुके शिवशाहीच्या अंमलाखाली येत. वर्ष १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर मोगलांची जुलमी राजवट आणि छळवाद याला कंटाळून कोकणपट्टीतील वतनदारांनी मोगलांच्या विरोधात बंड पुकारले. याच कालखंडात छत्रपती राजाराम महाराज यांनी दक्षिणेत जिंजी येथे राजधानी स्थापन केली. तेथूनच वतनदारांना जहागिरी दिली जात होती. उत्तर कर्नाटकात सौंध येथील सदाशिव राजे सौंधेकरांनी जिंजी येथे वर्ष १६९५ मध्ये वकील पाठवून छत्रपतींकडे स्वतःची निष्ठा व्यक्त केली आणि वार्षिक कर खंडणीच्या स्वरूपात देण्याचा करारही केला होता. तो करार आजही सापडतो. जातपात आणि धर्म बाजूला ठेवून जिज्ञासेने रत्नाकर देसाई यांनी अथक परिश्रमातून हा इतिहास उघडकीस आणला आहे.’’

अधिवक्ता नरेंद्र सावईकर म्हणाले, ‘‘गोव्याचा इतिहास वर्ष १९६१ मध्ये संपतो. त्यानंतरच्या स्वतंत्र गोव्याच्या इतिहासासह  पोर्तुगीज कालखंडातील इतिहासाचा शोध पुराव्यासह प्रसिद्धीला आणणे आणि राजे सौंधेकरांच्या इतिहासावर संशोधन करणे, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे.’’ पुस्तकाचे लेखक रत्नाकर देसाई मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘वयाच्या २६ व्या वर्षापासून मला इतिहासाच्या मुळाशी जाणे, त्यातील काही आवश्यक गोष्टींचे संशोधन करणे, हा छंद जडला. राजे सौंधेकरांच्या मूळ गावी जाऊन तेथील शिलालेख अभ्यासले आणि काही भग्न अवशेष अभ्यासले. केवळ छंद म्हणून या गोष्टी करतांना पुस्तक लिहिण्याचा विचार नव्हता; पण नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने योगायोगाने हे पुस्तक प्रकाशित झाले.

श्री. दिलीप ढवळीकर आणि श्री. अरुण देसाई यांनी राजे सौंधेकरांच्या इतिहासाचा उल्लेख करून या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पौर्णिमा नाईक, तर सूत्रसंचालन सौ. दीपा मिरिंगकर यांनी केले आणि श्री. सागर भट यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आमदार श्री. सुदिन ढवळीकर आणि अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती.