‘प.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानी ‘भक्तांनी सिगारेट पेटवणे’ या रूढीविषयी वैज्ञानिक संशोधन !

विविध उपासनेसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘प.पू. भालचंद्र महाराज यांना त्यांचे भक्त ‘बाबा’ म्हणतात. बाबांची कोणी चेष्टामस्करी करत, कोणी उपहास करत; परंतु बाबांना त्याचे काही वाटत नसे. कोण विड्या, तर कोण सिगारेट देत असत. बाबा ते फुंकून टाकीत. त्यांचा धूर गिळत नसत, तर धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवत असत.

प.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त तेथे ‘सिगारेट’ पेटवतात. ‘संतांच्या समाधीस्थानी भक्तांनी सिगारेट पेटवणे’, या प्रचलित रूढीचे वैज्ञानिक उपकरणाद्वारे संशोधन करण्यासाठी ९.१२.२०१८ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत संतांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेणार्‍या एका भक्ताने पेटवलेली सिगारेट आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाने पेटवलेली सिगारेट, तसेच तुलनेसाठी न पेटवलेली सिगारेट यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन – न पेटवलेल्या सिगारेटमध्ये नकारात्मक ऊर्जा असणे; पण भक्त आणि साधक यांनी पेटवलेल्या सिगारेटमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे : न पेटवलेल्या सिगारेटमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ १.०९ मीटर होती. याउलट भक्त आणि साधक यांनी पेटवलेल्या सिगारेटमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन – न पेटवलेल्या सिगारेटमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे; पण भक्ताने पेटवलेल्या सिगारेटमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे आणि साधकाने पेटवलेल्या सिगारेटमधील सकारात्मक ऊर्जा भक्ताने पेटवलेल्या सिगारेटमधील सकारात्मक ऊर्जेपेक्षा अधिक असणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. न पेटवलेल्या सिगारेटमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. भक्ताने आणि साधकाने पेटवलेल्या सिगारेटमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ अनुक्रमे ०.६८ मीटर आणि १.४६ मीटर होती.

३. निष्कर्ष

सौ. मधुरा कर्वे

३ अ. सिगारेटमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : सिगारेट ही आरोग्यास हानीकारक आहे. तिची निर्मिती करण्यामागील उद्देश, तसेच तिच्या निर्मितीतील घटक असात्त्विक असल्याने तिच्यामध्ये नकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात आढळणे स्वाभाविक आहे. चाचणीतील न पेटवलेल्या सिगारेटमध्ये यामुळेच नकारात्मक ऊर्जा आढळली; पण सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्या सिगारेटची एकूण प्रभावळ ही नकारात्मक ऊर्जेची एकूण प्रभावळ आहे.

३ आ. भक्त आणि साधक यांनी पेटवलेल्या सिगारेटमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच न आढळता उलट सकारात्मक ऊर्जा आढळण्यामागील शास्त्र : भक्त आणि साधक यांनी पेटवलेल्या सिगारेटमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. उलट त्या दोन्ही पेटवलेल्या सिगारेटमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.

३ आ १. प.पू. भालचंद्र महाराजांचे विड्या आणि सिगारेट फुंकण्याचे वैशिष्ट्य : पूर्वी जेव्हा प.पू. भालचंद्र महाराज यांची (बाबांची) समाजाला ओळख नव्हती, तेव्हा ते लोकांना उकीरड्यावर लोकांचे उष्टे अन्न खातांना किंवा लोकांनी अर्धवट टाकलेल्या विड्या किंवा सिगारेट ओढतांना दिसत. जेव्हा त्यांच्या संतत्वाची प्रचीती लोकांना आली, तेव्हा लोक त्यांना विड्या किंवा सिगारेट अर्पण करू लागले. लोकांना वाटे, ‘बाबांना विड्या आणि सिगारेट यांचे व्यसन आहे’; पण संतांना तसे काही नसते. बाबा लोकांनी दिलेल्या विड्या किंवा सिगारेट ओढत. ‘या माध्यमातून आपल्या दुःखाचे किंवा कष्टाचे निवारण होत आहे’, अशी अनुभूती लोकांना येत असे. काही वेळा बाबा काही भक्तांना सिगारेटचे चटकेही देत; पण भक्तांना फारशा वेदना होत नसत. उलट ‘या माध्यमातूनही आपले तीव्र प्रारब्ध बाबांनी दूर केले’, अशी अनुभूती भक्तांना येत असे. या अनुभूतींतूनच बाबांना विड्या किंवा सिगारेट अर्पण करण्याची प्रथा पडली. ती आताही चालू आहे. बाबांच्या समाधीसमोर भक्त विड्या किंवा सिगारेट पेटवतात आणि आपल्या व्यथा दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करतात. अजूनही भक्तांना बाबांच्या कृपेची अनुभूती येते.

३ आ २. भक्ताने पेटवलेली सिगारेट : भक्ताने पेटवलेल्या सिगारेटमागे त्याची श्रद्धा असल्याने आणि बाबा खरोखरच खर्‍या भक्तावर कृपा करत असल्याने त्याने पेटवलेल्या सिगारेटमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली नाही. याउलट तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली. भक्ताने पेटवलेल्या सिगारेटमधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, हे बाबांनी भक्ताचे दुःख किंवा त्रास दूर केल्याचे द्योतक आहे. त्या सिगारेटमध्ये आढळून आलेली सकारात्मक ऊर्जा हे बाबांच्या भक्तावरील कृपेचे द्योतक आहे.

३ आ ३. ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाने पेटवलेली सिगारेट : अनेक वर्षांच्या आणि योग्य मार्गदर्शनानुसार केलेल्या साधनेमुळे या साधकाची आध्यात्मिक प्रगती झालेली असून त्याची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आहे. तो साधक बाबांचा भक्त नसला, तरी ईश्‍वरप्राप्तीसाठी तळमळीने प्रयत्न करणारा साधकजीव आहे. ‘संत ईश्‍वराचे सगुण रूप असतात. बाह्यत: संत निराळे दिसत असले, तरी संतांमधील गुरुतत्त्व एकच असते’, अशी साधकाच्या गुरूंची शिकवण असल्याने त्या साधकाने श्रद्धेने संतांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले, तसेच तेथील प्रचलित रूढीप्रमाणे त्याने तेथे सिगारेटही पेटवली. भक्ताची साधना आणि भाव यांनुसार त्याला आपल्या भक्तीची प्रचीती मिळते. या साधकाचा भाव आणि त्याची सात्त्विकता यांचा एकत्रित परिणाम म्हणून त्याने पेटवलेल्या सिगारेटमध्ये सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली, तसेच त्या सिगारेटची एकूण प्रभावळही सर्वाधिक होती.

वरील वैज्ञानिक संशोधनातून संतांचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच संतांच्या समाधीस्थानी प्रचलित रूढी आणि परंपरा यांमागील कारण लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.१२.२०१८)

ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक