कोरोनाविषयीची काळजी घेत ‘शिवप्रतापदिन’ साजरा करावा ! – जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना

शेखर सिंह

सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) – कोरोना संसर्गाची काळजी घेत शासनाच्या वतीने प्रतापगड येथे ‘शिवप्रतापदिन’ साजरा करण्यात यावा. या वेळी सामाजिक अंतर, ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ आदींचा उपयोग करण्यात यावा, आदी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रतिवर्षीप्रमाणे प्रतापगडावर पारंपरिक पद्धतीप्रमाणे शिवप्रतापदिन साजरा करण्यात येईल. श्रीभवानीदेवीची पूजा, वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस जलाभिषेक आणि पुष्पहार अर्पण करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जावे. तसेच संबंधित विभागांनी योग्य ती कार्यवाही करावी.
चौकट
२१ डिसेंबर या दिवशी ‘शिवप्रतापदिन’ साजरा होत आहे; मात्र प्रतापगडावर गर्दी होऊ नये आणि कोरोना विषाणूचा संसर्ग अजून वाढू नये, यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने ‘शिवप्रतापदिन’ साजरा करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील शिवभक्त कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाच्या वतीने २१ डिसेंबरला संपूर्ण दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे.