जनतेला शिस्त नाही आणि त्यामुळे अशी सूचना करावी लागते, हे दुर्दैवी आहेच; पण संबंधित पालिका किंवा पंचायत प्रशासनानेही कचरा विल्हेवाटीची योग्य व्यवस्था केली, तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कुठे अल्प पडते ते पहावे !
पणजी, १५ डिसेंबर (स.प.) – भूमीगत वीजवाहिनी असलेल्या जागी उभारलेला विजेचा ट्रान्सफॉर्मर किंवा फीडर यांच्यापासून २ मीटर परिघात कचरा किंवा अन्य वस्तू टाकू नयेत, असे आवाहन वीज खात्याने जनतेला केले आहे. या कचर्यामुळे किंवा इतर वस्तूंमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियमित दुरुस्ती सेवा करणे कठीण बनते, तसेच या वस्तूंमुळे या ठिकाणी आग लागून खात्याच्या सामग्रीची हानी होऊ शकते. सामग्री पूर्ववत् करणे किंवा नवीन बसवणे यांमुळे दीर्घकाळासाठी त्या भागात वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. काही वेळा या ठिकाणी असलेल्या बंदिस्त गोष्टींमध्येही (फ्यूजचे बॉक्स, स्वीज बॉक्स आदी) कचरा आणून टाकलेला असतो. दुर्गम भागातील रस्त्याजवळील आणि मंडई (मार्केट) असलेल्या ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये हे प्रमाण अधिक आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी विनासायास जाता येणे आवश्यक असते, असे वीज खात्याने म्हटले आहे.