सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा डॉ. श्रीमंत चव्हाण

डॉ. श्रीमंत चव्हाण

सावंतवाडी – जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्यानंतर केवळ दोन मासांतच डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले होते. याच्या विरोधात स्थानिक सामाजिक संस्था, तसेच काही राजकीय पक्ष यांनी आवाज उठवत हे स्थानांतर रहित करण्याची मागणी केली होती. तसेच डॉ. चव्हाण यांनीही स्थानांतराच्या विरोधात ‘मॅट’कडे (Maharashtra Administrative Tribunal – महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे) धाव घेतली होती. याविषयी ‘मॅट’ने जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून स्वतःची नेमणूक कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून निर्माण झालेला वाद आता शमला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांचे ठाणे येथे स्थानांतर झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. श्रीमंत चव्हाण यांची दोन मासांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाली होती. नुकतीच त्यांनी जिल्ह्यातील एका खासगी आधुनिक वैद्यांच्या रुग्णालयावर धाड घातली होती. या वेळी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला होता. जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांनी डॉ. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे राजकीय दबावापोटी त्यांचे स्थानांतर करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात होत होती.

डॉ. चव्हाण यांनीही स्थानांतराच्या विरोधात मॅटकडे धाव घेतली होती. या कालावधीत जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे देण्यात आला होता; मात्र डॉ. चव्हाण यांनी पदभार न सोडल्याने नवा वाद निर्माण झाला होता. ‘मॅट’ने जिल्हा शल्यचिकित्सकपदी कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याने वादावर पडदा पडला.

या प्रक्रियेवर टीका करतांना माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले, ‘‘डॉ. चव्हाण यांचे स्थानांतर करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी प्रयत्न केले; मात्र त्यांना अपयश आले. अशा गोष्टींमध्ये शक्ती आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा आरोग्यसेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी सत्ताधार्‍यांनी प्रयत्न करावेत.’’