जिल्हा पंचायतीची आज निवडणूक

८ लाख मतदार २०३ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार

 

पणजी, ११ डिसेंबर (वार्ता.) – उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या एकूण ४८ मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षपातळीवर लढवली जात आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, आप आदी महत्त्वाचे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी १०४, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ९६ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामधील ३० मतदारसंघ राखीव आहेत. राज्यातील ८६६ मतदान केंद्रांमध्ये मतदान केले जाणार आहे. सुमारे ८ लाख मतदार २०३ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांना ‘मास्क’ घालणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे घरी अलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनाही ‘पीपीई किट’ घालून दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान करता येणार आहे.

निवडणुकीला अल्प प्रतिसाद लाभण्याची शक्यता

जिल्हा पंचायत निवडणुकीविषयी गोव्यात काही ठिकाणी मतदारांमध्ये निरुत्साह दिसत आहे. विशेष म्हणजे काही दुर्गम भागात रहाणार्‍या मतदारांना या निवडणुकीविषयी कल्पनाही नसल्याचे समजते. कोरोना महामारीमुळे, तसेच गोव्यासारख्या लहान राज्यामध्ये जिल्हा पंचायतीला अल्प अधिकार देण्यात आलेले असल्याने या निवडणुकीत अनेकांना स्वारस्य नाही. निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर अल्प कालावधीत निवडणूक घेण्यात येत असल्याने, तसेच कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत निवडणूक घ्यावी लागत असल्याने निवडणुकीची सिद्धता करणार्‍या निवडणूक अधिकार्‍यांना कठीण स्थितीला सामोरे जावे लागत आहे. घरी अलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना ‘पीपीई’ किट घालून दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान करण्यासाठी अनुमती देण्यात आल्याने स्वत:च्या आणि अन्य मतदारांच्या सुरक्षेवरून मतदार केंद्रातील कर्मचार्‍यांना अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत.